For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लखनौचा मुंबईवर 4 गड्यांनी विजय

06:58 AM May 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
लखनौचा मुंबईवर 4 गड्यांनी विजय
Advertisement

सामनावीर स्टोइनिसचे शानदार अर्धशतक, लखनौ गुणतक्यात तिसऱ्या स्थानी

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या 48 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 4 चेंडू बाकी ठेवून 4 गड्यांनी पराभव केला. या विजयामुळे लखनौने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 12 गुणासह तिसरे स्थान घेतले आहे. तर मुंबईचा संघ 6 गुणासह नवव्या स्थानावरच राहिला आहे. मुंबई इंडियन्स संघाने यजमान लखनौ सुपर जायंट्सला विजयासाठी 145 धावांचे टार्गेट दिले. मुंबई संघाने 20 षटकात 7 बाद 144 धावा जमविल्या. त्यानंतर लखनौने 19.2 षटकात 6 बाद 145 धावा जमवित विजय नोंदविला.

Advertisement

 

लखनौच्या डावामध्ये स्टोईनिसने 45 चेंडूत 2 षटकार 7 चौकारांसह 62, कर्णधार के. एल. राहुलने 22 चेंडूत 1 षटकार 3 चौकारांसह 28, हुडाने 18 चेंडूत 2 चौकारासह 18, पुरनने 14 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 14, टर्नरने 5 तर बडोनीने 1 चौकारासह 6 धावा जमविल्या. लखनौला 11 अवांतर धावा मिळाल्या. लखनौच्या डावामध्ये पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर सलामीचा अर्शिन कुलकर्णी खाते उघड्यापूर्वीच पायचीत झाला. त्यानंतर राहुल आणि स्टोईनीस यानी दुसऱ्या गड्यासाठी 58 धावांची भागीदारी केली. राहुल बाद झाल्यानंतर स्टोईनीस आणि हुडा यांनी तिसऱ्या गड्यासाठी 40 धावांची भर घातली. लखनौच्या डावात 3 षटकार आणि 14 चौकार नेंदविले गेले. लखनौने पॉवरप्लेच्या 6 षटकात 52 धावा जमविताना 1 गडी गमविला. लखनौचे अर्धशतक 32 चेंडूत तर शतक 80 चेंडूत फलकावर लागले. स्टोईनीसने 39 चेंडूत 1 षटकार 6 चौकारांसह अर्धशतक झळकविले. या सामन्यात मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवच्या जागी तुषाराला तर लखनौतर्फे मयांक यादवच्या जागी अर्शिन कुलकर्णीला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरविले. मुंबईतर्फे पंड्याने 26 धावात 2 तर तुषारा, कोएत्झी आणि नबी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

लखनौचा भेदक मारा

तत्पूर्वी, या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला फलंदाजीचे निमंत्रण दिले. लखनौने सुरवातीपासूनच अचूक आणि शिस्तबध्द गोलंदाजी तसेच चपळ क्षेत्ररक्षण केल्याने मुंबईच्या फटकेबाजीला त्यांनी आळा घातला. मुंबईच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक नेंदविता आले नाही.

 

डावातील दुसऱ्या षटकात मोहसिन खानने कर्णधार शर्माला 4 धावावर झेलबाद केले. त्यानंतर स्टाईनिसने सूर्यकुमार यादवला राहुलकडे झेल घेण्यास भाग पाडले. सूर्यकुमारने 6 चेंडूत 1 षटकारासह 10 धावा जमविल्या. तिलक वर्मा एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. त्याने 7 धावा केल्या. कर्णधार पंड्याला खातेही उघडता आले नाही. नवीन उल हकने त्याला राहुलकरवी झेलबाद केले. मुंबईची यावेळी स्थिती 4 बाद 27 अशी होती. नेहल वढेरा आणि इशान किशन यांनी पाचव्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केल्याने मुंबईला 144 धावापर्यंत मजल मारता आली. बिश्नोईने इशान किशनला झेलबाद केले. त्याने 36 चेंडूत 3 चौकारांसह 32 धावा जमविल्या. वढेराला डेव्हीडकडून बऱ्यापैकी साथ मिळाली. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 32 धावांची भर घातली. मोहसीन खानच्या गोलंदाजीवर वढेराचा त्रिफळा उडाला. त्याने 41 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 46 धावा जमविल्या. नबी एका धावेवर बाद झाला. डेव्हीडने 18 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 35 तर कोएत्झीने नाबाद 1 धाव जमविली. मुंबईला अवांतर 8 धावा मिळाल्या.

 

मुंबईने पॉवरप्लेच्या 6 षटकात 28 धावा जमविताना 4 गडी गमविले. मुंबईचे अर्धशतक 57 चेंडूत तर शतक 93 चेंडूत फलकावर लागले. वढेरा आणि इशान किशन यांनी अर्धशतकी भागीदारी 51 चेंडूत पूर्ण केली. मुंबईच्या डावात 4 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. लखनौतर्फे मोहसीन खानने 2 तर स्टोईनीस, नवीन उल हक, मयांक यादव, बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स 20 षटकात 7 बाद 144 (वढेरा 46, डेव्हीड नाबाद 35, इशान किशन 32, रोहित शर्मा 4, तिलक वर्मा 7, हार्दिक पंड्या 0, अवांतर 8, मोहसीन खान 2-36, स्टोईनीस, नवीन उल हक, मयांक यादव, बिश्नोई प्रत्येकी 1 बळी). लखनौ सुपर जायंट्स 19.2 षटकात 6 बाद 145 (स्टोईनीस 62, के. एल. राहुल 28, हुडा 18, पुरन नाबाद 14, टर्नर 5, बडोनी 6, अवांतर 11, पंड्या 2-26, कोत्झी 1-29, नबी 1-16).

Advertisement
Tags :

.