लखनौने विजयासह चेन्नईचा खेळ बिघडवला
चेन्नईचा प्ले ऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर : सामनावीर मिचेल मार्शची 90 धावांची खेळी, आकाश सिंगचे 3 बळी
वृत्तसंस्था/ लखनौ
एकाना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात लखनौने शानदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सवर 7 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 20 षटकांत 5 बाद 187 धावा केल्या. त्यानंतर लखनौने विजयी लक्ष्य 16.4 षटकांत अवघ्या तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. लखनौकडून मिचेल मार्शने दमदार 90 धावांची खेळी केली, त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या सामन्यापूर्वी 12 गुणांसह चेन्नईचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीत कायम होता, परंतु लखनौकडून झालेल्या पराभवाने सर्व गणित बिघडले. आता चेन्नईला उर्वरित दोन सामन्यांत विजयासह इतरांच्या निकालावरही अवलंबून रहावे लागेल.
चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 188 धावांचा पाठलाग करताना मिचेल मार्श आणि जोश इंग्लिस या जोडीने पहिल्या विकेटसाठी 70 चेंडूत 135 धावा जोडल्या आणि लखनौच्या विजयाचा पाया रचला. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेला जोश इंग्लिस 36 धावांवर माघारी परतला. तर मिचेल मार्शने 38 चेंडूत 9 चौकार आणि 7 षटकारांसह 90 धावांची खेळी केली. त्याचे शतक थोडक्यात हुकले. मार्श बाद झाल्यानंतर अब्दुल समदही अवघ्या 8 धावांवर माघारी परतला. शेवटी निकोलस पूरनने 17 चेंडूत नाबाद 32 आणि मुकुल चौधरीने नाबाद 13 धावांची खेळी करून लखनौला 16.4 षटकांतच विजय मिळवून दिला.
चेन्नईला पराभवाचा धक्का
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला हवी तशी सुरुवात करता आली नाही. संजू सॅमसन अवघ्या 20 तर ऋतुराज गायकवाड 13 धावा करून माघारी परतले. त्यानंतर उर्विल पटेल अवघ्या 6 धावांवर बाद झाला. यानंतर कार्तिक शर्माने 42 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 71 धावांची बहुमूल्य खेळी केली. शेवटी शिवम दुबेने नाबाद 32 धावांची खेळी करून संघाची धावसंख्या 187 धावांवर पोहोचवली. याशिवाय, ब्रेव्हिसने 25 धावांचे योगदान दिले. लखनौच्या आकाश सिंगने सॅमसन, उर्विल पटेल, कर्णधार गायकवाड असे तीन महत्त्वाचे बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्स 20 षटकांत 5 बाद 187 (संजू सॅमसन 20, ऋतुराज गायकवाड 13, उर्विल पटेल 6, कार्तिक शर्मा 71, ब्रेव्हिस 25, शिवम दुबे नाबाद 32, प्रशांत वीर नाबाद 13, आकाश सिंग 3 बळी, शमी आणि शाहबाज अहमद प्रत्येकी 1 बळी)
लखनौ सुपर जायंट्स 16.4 षटकांत 3 बाद 188 (मिचेल मार्श 90, जोस इंग्लिश 36, निकोलस पूरन 17 चेंडूत नाबाद 32, अब्दुल समद 7, मुकुल चौधरी नाबाद 13, मुकेश चौधरी आणि जॉन्सन प्रत्येकी 1 बळी).
चेन्नईच्या पराभवाचा राजस्थानला फायदा
लखनौचा या हंगामातील चौथा विजय ठरला आहे. 8 गुणांसह हा संघ गुणतालिकेत शेवटीच आहे. पण या पराभवाचा चेन्नईला चांगलाच फटका बसला आहे. चेन्नईचा संघ 12 गुणांसह सहाव्या स्थानी आहे. चेन्नईला हा सामना जिंकून टॉप 3 मध्ये प्रवेश करण्याची संधी होती. पण सामन्याआधी पाचव्या स्थानी असलेला चेन्नईचा संघ सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तर नेट रनरेटच्या बळावर राजस्थानचा संघ पाचव्या स्थानी पोहोचला आहे. या पराभवानंतर चेन्नईच्या खात्यात 12 सामन्यानंतर 12 गुण झाले आहेत. त्यांना उर्वरित दोन सामन्यांत सनरायझर्स हैदराबाद (18 मे) व गुजरात टायटन्स (21 मे) यांचा सामना करावा लागणार आहे. हे दोन्ही सामने जिंकून ते 16 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. पण, त्यांना इतर निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे.
-आयपीएलमध्ये लखनौकडून सर्वाधिक 21 झेल टिपण्याचा विक्रम करताना दीपक हुडाचा 20 झेलांचा विक्रम मागे टाकला
-मार्श-इंग्लिस यांच्या शतकी भागीदारीने लखनौचा विजय सोपा झाला
-चेन्नईच्या आघाडी फळीचे अपयश त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरले