लखनौ जायंट्सचा चौथा विजय
गुजरात टायटन्स पराभूत, सामनावीर मार्व्रेम, पुरन यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ लखनौ
निकोलास पूरन आणि सामनावीर अॅडेन मार्व्रेम यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर शनिवारी येथे झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा 3 चेंडू बाकी ठेऊन 6 गड्यांनी पराभव केला. या स्पर्धेतील लखनौचा हा चौथा विजय असून त्यांनी गुणतक्त्यात 8 गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. तर गुजरात टायटन्स 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील शनिवारचा हा 26 वा सामना होता. या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजी दिली. गुजरात टायटन्सने 20 षटकात 6 बाद 180 धावा जमविल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सने 19.3 षटकात 4 बाद 186 धावा जमवित विजय नोंदविला.
गुजरातच्या डावामध्ये सलामीच्या साई सुदर्शन आणि कर्णधार गिल यांनी 73 चेंडूत 120 धावांची शतकी भागिदारी केली. गिलने 38 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 60 तर साई सुदर्शनने 37 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 56 धावा झळकाविल्या. बटलरने 14 चेंडूत 2 चौकारांसह 16 तर रुदरफोर्डने 19 चेंडूत 3 चौकारांसह 22, शाहरुख खानने 6 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 11 धावा केल्या. गुजरातच्या डावात 3 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. गुजरातने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 54 धावा झोडपल्या. लखनौतर्फे प्रसिद्ध शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 तर राठी आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लखनौच्या डावामध्ये सलामीच्या मार्व्रेमने 31 चेंडूत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 58 धावा झोडपल्या. कर्णधार पंत आणि मार्व्रेम यांनी सलामीच्या गड्यासाठी 38 चेंडूत 65 धावांची भागिदारी केली. पंतने 18 चेंडूत 4 चौकारांसह 21 धावा जमविल्या. मार्व्रेम आणि निकोलस पूरन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 58 धावांची भर घातली. पुरनने 34 चेंडूत 7 षटकार आणि 1 चौकारासह जलद 61 धावा झळकाविल्या. बदोनीने 20 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 28 धावा जमविल्या. बदोनीने विजयी षटकार खेचला. लखनौच्या डावामध्ये 9 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. गुजराततर्फे प्रसिद्ध कृष्णाने 2 तर रशिद खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यात मार्व्रेमने गिल आणि तेवातिया यांचे अप्रतिम झेल टिपले.
संक्षिप्त धावफलक : गुजरात टायटन्स 20 षटकात 6 बाद 180 (गिल 60, साई सुदर्शन 56, रुदरफोर्ड 22, शाहरुख खान नाबाद 11, अवांतर 9, शार्दुल ठाकूर व बिश्नोई प्रत्येकी 2 बळी, राठी, आवेश खान प्रत्येकी 1 बळी), लखनौ सुपर जायंट्स 19.3 षटकात 4 बाद 186 (मार्व्रेम 58, निकोलस पूरन 61, पंत 21, बदोनी नाबाद 28, अवांतर 9, प्रसिद्ध कृष्णा 2-26, रशिद खान व वॉशिंग्टन सुंदर प्रत्येकी 1 बळी).