For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे 11 वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू? छेडछाडीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष, प्रभारी निलंबित

08:22 PM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे 11 वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू  छेडछाडीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष  प्रभारी निलंबित
Advertisement
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महिला सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर चिंता व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. मलिहाबाद येथील कसमंडी कला परिसरात छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय अकरावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली. आरोपीविरोधात वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, प्रथमदर्शनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कसमंडी कला चौकी प्रभारी विवेक कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे.

घरात आढळला विद्यार्थिनीचा मृतदेह

पीडित विद्यार्थिनीचे वडील सोमवारी सकाळी पत्नी आणि लहान मुलीसह बाजारात गेले होते. दुपारी सुमारे 12 वाजता ते घरी परतले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा ढकलला. त्यावेळी घरातील खोलीत साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळला.

Advertisement

या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. शेजाऱ्यांच्या मदतीने विद्यार्थिनीला खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

सहा महिन्यांपासून छेडछाडीचा आरोप

पीडितेच्या वडिलांच्या आरोपानुसार, परिसरातील हंस कुमार हा युवक गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या मुलीचा पाठलाग करून छेडछाड करत होता. शाळेत ये-जा करताना तो तिला त्रास देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

20 मे रोजी छेडछाडीला विरोध केल्यामुळे आरोपीने विद्यार्थिनीच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर जखम झाली असून तीन टाके घालावे लागले होते. या घटनेनंतर त्यांनी कसमंडी कला पोलिस चौकी आणि संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

घरात घुसून विद्यार्थिनीवर हल्ला

13 ऑक्टोबर रोजी विद्यार्थिनी घरात एकटी असताना आरोपीने घरात प्रवेश करून तिच्याशी छेडछाड केली. विरोध केल्यावर तिला मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर विद्यार्थिनी प्रचंड दहशतीत होती.

वडिलांनी या प्रकरणाची तक्रार पुन्हा कसमंडी कला चौकी प्रभारी विवेक कुमार यांच्याकडे केली होती. मात्र, वारंवार चौकी आणि पोलीस ठाण्याचे फेरे मारूनही आरोपीविरोधात कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांच्या कथित निष्क्रियतेमुळे आरोपीचे धाडस वाढले आणि मुलीला सतत त्रास सहन करावा लागला, असा आरोप त्यांनी केला.

मृत्यूनंतर पोलिसांची कारवाई

विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी आरोपी हंस कुमार याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तसेच, प्रकरणातील प्रथमदर्शनी निष्काळजीपणाच्या आरोपांवरून कसमंडी कला चौकी प्रभारी विवेक कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे.

या घटनेमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. छेडछाडीच्या तक्रारींकडे वेळेत लक्ष दिले असते, तर ही दुर्दैवी घटना टाळता आली असती का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Advertisement
Tags :

.