For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लखनौची गुजरातवर 33 धावांनी मात

06:55 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
लखनौची गुजरातवर 33 धावांनी मात
Advertisement

सामनावीर यश ठाकुरचे 5, कृणाल पंड्याचे 3 बळी, स्टोइनिसचे अर्धशतक, बिश्नोईचा अप्रतिम झेल

Advertisement

 ► वृत्तसंस्था/ लखनौ

वेगवान गोलंदाज यश ठाकुर व फिरकी गोलंदाज कृणाल पंड्या यांचा भेदक मारा व मार्कस स्टोइनिसचे अर्धशतक यांच्या बळावर लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सवर 33 धावांनी विजय मिळवित गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.  30 धावांत 5 बळी मिळविणाऱ्या यश ठाकुरला सामनावीराचा बहुमान मिळाला.

Advertisement

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या 21 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 5 बाद 163 धावा जमवित गुजरात जायंट्सला विजयासाठी 164 धावांचे आव्हान दिले होते. स्टोइनिसने अर्धशतक नोंदवले तर कर्णधार केएल राहुल (31 चेंडूत 33) व निकोलस पूरन (22 चेंडूत 35) यांनीही उपयुक्त योगदान दिले. त्यानंतर गुजरात टायटन्सचा डाव 18.5 षटकांत 130 धावांत गुंडाळून लखनौने आरामात विजय मिळविला. त्यांचा हा चार  सामन्यातील तिसरा विजय आहे तर गुजरात 5 सामन्यातील तिसरा पराभव असून ते सातव्या स्थानावरच राहिले आहेत.

गुजरातच्या डावात सलामीवीर साई सुदर्शन व अखेरच्या टप्प्यात राहुल तेवातिया यांनी उपयुक्त योगदान दिले. अन्य फलंदाजांनी निराशा केल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. साई सुदर्शनने 23 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 31 तर तेवातियाने 25 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 30 धावा फटकावल्या. अन्य फलंदाजांत कर्णधार शुभमन गिलने 19, विजय शंकरने 17, दर्शन नलकांडेने 12 धावा जमविल्या. याशिवाय त्यांना 12 अवांतर धावा मिळाल्या. यश ठाकुरने आयपीएलमधील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना 30 धावांत 5 बळी टिपले तर कृणालने 11 धावांत 3 बळी मिळविले. याशिवाय नवीन उल हक व रवी बिश्नोईने एकेक बळी टिपले. बिश्नोईने आपल्याच गोलंदाजीवर केन विल्यम्सनचा उंच झेप घेत अफलातून झेल पकडला. विल्यम्सनला केवळ एक धाव काढता आली. लखनौचा वेगवान गोलंदाज मयांक यादव स्नायू दुखावल्याने एक षटक टाकल्यानंतर मैदानाबाहेर गेला.

लखनौची खराब सुरुवात

या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. उमेश यादवच्या पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर सलामीचा डिकॉक झेलबाद झाला. त्याने 1 षटकारासह 6 धावा जमविल्या. उमेश यादवने आपल्या दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर देवदत्त पडीक्कलला विजय शंकरकरवी झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 7 धावा जमविल्या. कर्णधार के. एल. राहुल आणि स्टोइनीस यांनी तिसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागीदारी केली. नलकांडेने राहुलला तेवातियाकरवी झेलबाद केले. त्याने 31 चेंडूत 3 चौकारासह 33 धावा जमविल्या. दरम्यान स्टोईनसने आपले अर्धशतक 40 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकाराच्या मदतीने झळकविले. नलकांडेने स्टोईनसला झेलबाद केले. त्याने 43 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह 58 धावा जमविल्या. निकोलास पूरन आणि बदोनी यांनी पाचव्या गड्यासाठी 31 धावांची भागीदारी केली. रशिद खानने बदोनीला यादवकरवी झेलबाद केले. त्याने 11 चेंडूत 3 चौकारासह 20 धावा जमविल्या. पूरनने 22 चेंडूत 3 षटकारासह नाबाद 32 धावा जमविल्या. कृणाल पंड्या 2 धावावर नाबाद राहिला. लखनौला अवांतर पाच धावा मिळाल्या.

लखनौने पॉवरप्लेच्या 6 षटकात 47 धावा जमविताना 2 गडी गमविले. लखनौचे अर्धशतक 39 चेंडूत तर शतक 65 चेंडूत, दीडशतक 111 चेंडूत फलकावर लागले. राहुल आणि स्टोइनीस यांनी अर्धशतकी भागीदारी 38 चेंडूत नोंदविली. गुजरातर्पे उमेश यादव आणि दर्शन नलकांडे यांनी प्रत्येकी 2 तर रशिद खानने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : लखनौ सुपर जांयट्स 20 षटकात 5 बाद 163 (स्टोईनिस 58, पूरन नाबाद 32, के. एल. राहुल 33, डी कॉक 6, पडिक्कल 7, बदोनी 20, अवांतर 5, उमेश यादव 2-22, नलकांडे 2-21, रशिद खान 1-28).

गुजरात जायंट्स 18.5 षटकांत सर्व बाद 130 : साई सुदर्शन 23 चेंडूत 31, गिल 21 चेंडूत 19, विल्यम्सन 1, बीआर शरथ 2, विजय शंकर 17 चेंडूत 17, दर्शन नलकांडे 11 चेंडूत 12, राहुल तेवातिया 25 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 30, उमेश यादव 2, नूर अहमद 4, अवांतर 12, यश ठाकुर 5-30, कृणाल पंड्या 3-11, बिश्नोई 1-8, नवीन उल हक 1-37.

Advertisement
Tags :

.