पाकिस्तानात एलपीजी टँकरचा विस्फोट, 6 ठार
लाहोर :
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका औद्योगिक क्षेत्रात द्रव्यीकृत पेट्रोलियम गॅसने भरलेल्या एका टँकरमध्ये विस्फोट झाला आहे. यादरम्यान एका अल्पवयीन मुलीसमवेत 6 जणांचा मृत्यू झाला तर 31 जण जखमी झाले आहेत. ही घटना मुल्तानच्या हामिदपूर कनोरा भागातील औद्योगिक क्षेत्रात घडली आहे. एलपीजी टँकरमध्ये विस्फोट झाल्याने सोमवारी भीषण आग लागली आणि यात मोठी जीवितहानी झाली आहे. अग्निशमन दलाने अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले.
या विस्फोटामुळे परिसरातील 20 घरं नष्ट झाली असून 70 घरांचे आंशिक नुकसान झाले आहे. औद्योगिक क्षेत्रात उभ्या करण्यात आलेल्या टँकरच्या एका वॉल्वमधून गॅस गळती सुरू झाली होती. टँकरमध्ये विस्फोट होण्यापूर्वी वायूचा गंध जाणवल्याने अनेक लोक तेथून निघून गेले होते. या दुर्घटनेतील जखमींपैकी 13 जणांची प्रकृती गंभीर आहे. खबरदारीदाखल परिसरातील वीज अन् वायूपुरवठा रोखण्यात आला होता, अशी माहिती पोलीस अधिकारी सादिक अली यांनी दिली आहे.