‘एलपीजी’ काळ्याबाजाराचा पर्दाफाश
मोठ्याप्रमाणात सीलबंद सिलींडर कमी वजनाचे : नागरी पुरवठा खात्याची सांकवाळात कारवाई
फोंडा : घरगुती व व्यावसायिक वापरातील एलपीजी सिलींडरमधील गॅस चोरीचा खुलेआम चाललेल्या काळ्याबाजाराचा नागरी पुरवठा खात्याने पर्दाफाश केला आहे. सांकवाळ येथे मंगळवारी टाकलेल्या छाप्यात मोठ्याप्रमाणात कमी वजनाचे गॅस सिलींडर जप्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये कादेश गॅस सर्विसेस या एजन्सीची 6 आणि अन्य एक मिळून 7 गॅस सिलींडरची वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी वेर्णा पोलिसात गुन्हा नोंदविलण्यात आला असून दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यामार्फत पुढील तपास होणार आहे. या धडक कारवाईमध्ये जप्त केलेल्या भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या 1023 गॅस सिलींडरपैकी तब्बल 283 एलपीजी गॅस सिलींडर कमी वजनाचे आढळून आले आहेत.
तब्बल 515 सिलींडर विनासील
सीलबंद गॅस सिलींडरमधील द्रव्य चोरुन रिकाम्या सिलींडरमध्ये भरुन त्याचा काळाबजार चालल्याचा हा एकंदरीत गैरप्रकार असल्याचे स्पष्ट होत आहे. जप्त केलेल्या सिलींडरमध्ये घरगुती व व्यावसायिक मिळून 515 सिलींडर विनासील आढळून आले आहेत. विशेष म्हणजे कमी वजनाच्या सिलींडरमध्ये 20 ते 40 टक्क्यांपर्यंत द्रव्य चोरल्याचे उघडकीस आले आहे. या काळ्याबाजारामुळे बऱ्याच ग्राहकांना कमी वजनाच्या सिलींडरचा पुरवठा होत असल्याचे उजेडात आले आहे.
खुल्या जागेत सुरु होता काळाबाजार
सांकवाळ येथील पिकॉक व्हॅली, रॉयल चिकनजवळ मुख्य रस्त्यापासून 500 मीटरच्या अंतरावर खुल्या जागेमध्ये वाहने उभी करुन हा काळाबाजार चालला होता. मात्र नेमके किती दिवसांपासून हे गैरप्रकार सुऊ होते ते सविस्तर तपासानंतर स्पष्ट होणार आहे. राज्यातील ग्राहकांना भारत गॅस आणि हिंदुस्तान प्रेट्रोलियम या दोन कंपन्यांमार्फत गॅस सिलींडरचा पुरवठा होतो.
गॅस कंपन्या, एजन्सी, खात्यावरही प्रश्नचिन्ह
घरगुती वापरातील गॅस सिलींडरचे वजन 14.2 किलो तर व्यावसायिक म्हणजेच हॉटेल व अन्य ठिकाणी पुरवठा होणाऱ्या गॅस सिलींडरचे वजन 19 किलो असते. याशिवाय 5 किलो वजनाच्या छोट्या व्यावसायिक सिलींडरचाही पुरवठा होत आहे. या काळ्याबाजारामुळे राज्यातील ग्राहकांना कमी वजनाचे गॅस सिलींडर पुरविले जात होते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यातील गॅस पुरवठादार वितरण एजन्सी संशयाच्या घेऱ्यात सापडल्या असून काही कंपन्यांची अधिकारी त्यांना सामील नाहीत ना, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. वजनमाप खात्याच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गॅस सिलींडरच्या पुरवठ्यामध्ये ‘मापावर पाप’ होत असल्यास ग्राहकांबरोबरच सरकारलाही त्याचा फटका बसलेला आहे. याशिवाय अशाप्रकारे उघड्यावर गॅस सिलींडरमधील द्रव खाली करणे हे धोक्याचे असल्याने सामाजिक सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे.
सात वाहने जप्त, एकटा पसार
मंगळवारी सायंकाळी 4 वाजता सुरु झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. रात्री 11.45 वा. कारवाई आटोपल्यानंतर वेर्णा पोलिसस्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला. या काळ्याबाजारात गुंतलेल्या काहीजणांसह गॅस सिलींडरची वाहतूक करणारी एकूण सात वाहने जप्त करण्यात आली. त्यामध्ये ट्रक आणि जीपगाड्यांचा समावेश आहे. अचानक टाकलेल्या या छाप्याच्यावेळी एक वाहनचालक वाहन तेथेच सोडून पसार झाल्याने त्याच्या मालकाचा शोध सुरु आहे.
नागरी पुरवठा खात्याचे साहाय्यक संचालक तुळशीदास दाभोळकर, महेशकुमार नाईक, विजयकुमार जामदार, निरीक्षक सरिता मोरजकर, उपनिरीक्षक सत्यवान नाईक, सिद्धानंद नार्वेकर तसेच भरारी पथकाचे रुबन तोरस्कर व श्रवण मळीक यांनी वेर्णा पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली. यावेळी बीपी आणि एचपी कंपनीचे विभाग प्रमुखही उपस्थित होते. पोलिस उपअधिक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार आहे.
ग्राहकांची फसवणूक खपवून घेणार नाही : मंत्री रवी नाईक
ग्राहकांना पुरवठा होणाऱ्या एलपीजी सिलींडरमधील द्रव्य चोरण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असून या काळ्याबाजारात गुंतलेल्यांवर कडक कारवाई होणार आहे. त्यासंबंधीचा सविस्तर अहवाल मागवून संबंधित खात्यांना पुढील आदेश देण्यात येतील, असे नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांनी सांगितले. सर्वसामान्य ग्राहकांची चाललेली फसवणून खपवून घेतली जाणार नाही. संबंधित यंत्रणानींही ग्राहकांना पुरवठा होणारे गॅस सिलींडर योग्य वजनप्रमाणात पुरविले जातात का ? याची दैनंदिन तपासणी करणे आवश्यक आहे. पुरवठादार एजन्सीकडून सिलींडरच्या वजनामध्ये तफावत आढळल्यास त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंत्री रवी नाईक यांनी दिला आहे.