बापट कॅम्प आणि परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा
कोल्हापूर :
कुंभारवाडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बापट कॅम्पमध्ये रोज पालिकेकडून पाणी पुरवठा होतो. मात्र येणारे पाणी हे कमी दाबाने येत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहरातील कुंभारबांधवांना व्यवसायासाठी पालिकेने बापट कॅम्प परिसरात जागा दिली. तिथे कुंभारबांधव गणेश मूर्ती बनवण्याचे काम करतात. तर त्यांनी तिथे घरेही बांधली आहेत. महापालिकेकडून त्यांना मूलभूत सोयीसुविधा दिल्या आहेत. रोज सायंकाळी तीन तास नळाला पाणी येते मात्र अत्यंत कमी दाबाने येत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दोन मजली घर असणाऱ्यांच्या दुसऱ्या मजल्यावर नाहीच शिवाय स्वयंपाक घरापर्यंत तरी पाणी यावे, अशी माफक अपेक्षा तेथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

इतर बापट कॅम्प परिसरात 80 टक्के रस्ते हे क्रॉक्रीटचे झाले असून उर्वरित आहेत. त्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. ती सुधारण्याची गरज आहे. या परिसरात असलेले विद्युत उपकेंद्राच्या प्रवेशद्वारावर नाले तुंबून सांडपाणी रस्त्यावर आले आहे. त्यातूनच अधिकारी कर्मचाऱ्यांना ये-जा करावी लागत आहे.
बापट कॅम्पमधून शिरोली जकात नाक्याकडे जात असताना एका रोडवेज कंपनीच्या दारातच पूर्ण नाला कचऱ्याने भरला आहे. त्याचे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे संपूर्ण डांबरीकरण केलेला रस्ता देखील सांडपाण्याने खराब झाला आहे. तसेच या परिसरात सध्या अहोरात्र गणेशमूर्ती करण्याचे काम कुंभार बांधव करत आहेत. त्यांना या दुर्गंधीचा व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.
या परिसरातील सार्वजनिक शौचालयासाठी असलेले नळकनेक्शन एका नागरिकाने कट केल्याने तिथे स्वच्छतेसाठी पाणी नाही. परिणामी परिसरात दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिकांनी केली. याच परिसराचा भाग असलेल्या मसोटे व मनाडे मळ्यात रस्ते नाहीत तर काही ठीकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीचा आधार घ्यावा लागत आहे.

बापट कॅम्प परिसरात सद्यस्थितीत दोन हजार लोकवस्ती असून तिथे 230 हे कुभांर बांधवाच्या सोसायटीचे प्लॉट आहेत तर उर्वरित 23 एकरवर महापालिकेने व्यवसायासाठी कुभांर बांधवाना दिले आहे. या ठिकाणी रस्ते बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. काही ठीकाणी जिथे जुनी घरे आहेत तिथे सांडपाण्यासाठी नाले नाहीत. बाहेर पडणारे सांडपाणी उघड्यावरच सोडले आहे. सध्या बापट कॅम्प परिसरातील कुंभार व्यावसायिकांची गणेशमूर्ती बनवण्याची गडबड सुरु आहे. येथील गणेशमूर्तींना कर्नाटक, गोवासह पश्चिम महाराष्ट्रात मागणी असते. त्यांना कामासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची अवश्यकता असते मात्र रात्री नळाला येणारे पाणी दिवसात दोन तासच येते पण तेही कमी दाबाने. यामुळे पाण्यावाचून कुंभार बांधवांचे हाल होत आहेत.