हितेश, सचिन, लव्हलिनाकडे भारताच्या 33 सदस्यीय संघाचे नेतृत्व
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलचे सुवर्णपदक विजेते हितेश गुलिया आणि सचिन सिवाच तसेच ऑलिंपिक पदक विजेती लव्हलिना बोरगोहेन यांच्या नेतृत्वाखाली 33 सदस्यीय भारतीय पुऊष आणि महिला संघ स्पेनमधील अलिकांटे येथील ला नुसिया येथे होणाऱ्या प्रतिष्ठित बॉक्सम एलिट आंतरराष्ट्रीय 2026 मध्ये देशाचे प्रतिनिधीत्व करेल. हा वर्षातील पहिला मोठा परदेश दौरा आहे.
या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा आणि आशियाई क्रीडास्पर्धांसाठी आवश्यक गती राष्ट्रीय स्पर्धा मिळवून देत असल्या, तरी ही स्पर्धा भारताच्या अव्वल बॉक्सरसाठी एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय चाचणी म्हणून काम करेल. नुकत्याच संपलेल्या 9 व्या पुऊष आणि महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमधील कामगिरीच्या आधारे या संघाची निवड करण्यात आली आहे. ऑलिंपिकमध्ये समावेश होणाऱ्या 18 वजनी गटांमध्ये सुवर्ण आणि रौप्यपदक विजेत्यांची निवड करण्यात आली आहे, तर बिगरऑलिंपिक विभागांमध्ये रौप्यपदक विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा मार्चमध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेपूर्वी महत्त्वाची तयारी करण्याची संधी प्रदान करते.
निवडीबद्दल बोलताना बीएफआयचे अध्यक्ष अजय सिंग म्हणाले की, 2025 मध्ये आम्ही मिळवलेल्या निकालांनंतर आता सातत्य आणि प्रगतीवर लक्ष केंद्रीत केले आहे. बॉक्सम एलिट हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. कारण आम्ही पुढील स्पर्धांची आणि एक आव्हानात्मक आंतरराष्ट्रीय कॅलेंडरची तयारी करत आहोत’. 2025 च्या ऐतिहासिक हंगामाच्या पार्श्वभूमीवर भारताने बॉक्सम एलिट 2026, मध्ये प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी ग्रेटर नोएडा येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्समध्ये विक्रमी 20 पदके भारतीयांनी जिंकली, ज्यामध्ये नऊ सुवर्णपदके समाविष्ट होती. या स्पर्धेतील भारताची आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
गेल्या वर्षी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय बॉक्सर्सनी सातत्यपूर्ण कामगिरी करत पदके मिळविली. या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा भारतीय बॉक्सिंगसाठी एक महत्त्वाचे संक्रमण देखील ठरेल, मुख्य प्रशिक्षक म्हणून सांतियागो निवा त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कामगिरीत महिला संघाची जबाबदारी स्वीकारतील, तर कुट्टप्पा चेनंदा अचैया प्रशिक्षक म्हणून पुऊष संघाचे नेतृत्व करतील.