For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

सुरेल नाट्यागीतांचा रसिकांना घडला सुरेख प्रवास

10:11 AM Apr 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुरेल नाट्यागीतांचा रसिकांना घडला सुरेख प्रवास

‘शाकुंतल ते कट्यार’ कार्यक्रमाचे उत्कृष्ट सादरीकरण

Advertisement

बेळगाव : ‘शाकुंतल’, ‘शारदा’, ‘मत्स्यगंधा’, ‘बंध रेशमाचे’, ‘ययाती-देवयानी’, ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘संशयकल्लोळ’, ‘कट्यार काळजात घुसली’ अशा एकाहून एक सरस संगीत नाटकांनी मराठी रंगभूमीला सोन्याचे दिवस आणले. या नाटकांमधील गीते आजही रसिकांच्या जिभेवर रुळली आहेत. यातील काही निवडक गीतांमधून नाट्यासंगीताचा प्रवास ‘शाकुंतल ते कट्यार’ या नाट्यागीतांच्या मैफलीतून मांडण्यात आला. विजापूर येथील दृष्टी फाऊंडेशनतर्फे नादब्रह्म पुणे प्रस्तुत ‘शाकुंतल ते कट्यार’ ही संगीत रंगभूमीची वैभवशाली व लोकप्रिय नाट्यागीतांची मैफल रविवारी लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडली. ख्यातनाम गायक डॉ. रविंद्र घांगुर्डे व डॉ. वंदना घांगुर्डे यांनी अजरामर संगीत नाटकांतील पदे सादर करून संगीत नाटकांच्या सुवर्णकाळाचा पडदा उघडला.

रसिकांचा भरभरून प्रतिसाद

Advertisement

डॉ. वंदना घांगुर्डे यांनी सादर केलेल्या ‘वद जाऊ कुणाला शरण’ या नाट्यागीताला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. शब्द आणि सुरांचा सुरेल मेळ घालत डॉ. वंदना व डॉ. रविंद्र यांनी गाजलेली नाट्यागीते सादर केली. रसिकांच्या आग्रहाखातर काही नाट्यागीतांचे मुखडे सादर करण्यात आले. प्रारंभी दृष्टी फाऊंडेशनच्या संचालिका मीना अथणी यांनी या कार्यक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला. संजय गोसावी यांनी अतिशय सुंदर शब्दात तसेच नाट्यागीतांमागील प्रसंग यांची माहिती निवेदनातून मांडली. लिलाधर चक्रदेव यांनी ऑर्गन साथ, परेश पेठे यांनी तबला तर अभिलाष लघाटे यांनी व्हायोलिनवर साथ दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यास साहाय्य केल्याबद्दल रंगकर्मी प्रभाकर शहापूरकर यांचा सत्कार करण्यात आला. प्राजक्ता बेडेकर यांनी प्रास्ताविक केले तर मीना अथणी यांनी आभार मानले.

Advertisement

किर्लोस्कर-देवल यांनी संगीत रंगभूमी गाजविली

31 ऑक्टोबर 1880 मध्ये अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी ‘संगीत शाकुंतल’ हे पहिले व्यावसायिक संगीत नाटक सादर केले. किर्लोस्करांची कारकीर्द जरी महाराष्ट्रात घडली असली तरी त्यांचा पाया हा बेळगावमध्ये रोवला गेला. ते बेळगावच्या सरदार्स हायस्कूलमध्ये अध्यापन करत होते. ते करत असतानाच त्यांनी संगीत नाटकांची निर्मिती केली. याच शाळेत त्यांना गोविंद बल्लाळ देवल यांची ओळख झाली. या गुरु-शिष्याच्या जोडीने अनेक संगीत नाटकांनी रंगभूमी गाजविल्याचे डॉ. रविंद्र घांगुर्डे यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले.

Advertisement
Tags :
×

.