For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur Crime | प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून खून

05:37 PM Jun 21, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
solapur crime   प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून खून
Advertisement
रस्त्यात कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून
सोलापूर : प्रेयसीच्या पतीवर भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून केल्याच्या घटनेने सोलापूर हादरले. अक्कलकोट रोड एमआयडीसी मधील सुनील नगरातील एका कंपनीसमोर शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही थरारक घटना घडली. या हल्ल्यात मध्यस्थी करायला गेलेले मृताचे भावजी देखील गंभीर जखमी झाले आहेत.
सिद्धाराम कैलास कटप (वय २०, रा. चिप्पा मेवॉनिकच्या बोळात, आकाशवाणी केंद्र) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिद्धाराम हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
 
याबाबत श्रुती सिद्धाराम कटप (वय १९, रा. चिप्पा मेकॅनिकच्या बोळात, आकाशवाणी केंद्र) या विवाहितेच्या फिर्यादीवरून संतोष महादेव पाटील (वय २३, रा. कलावती नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी संतोष पाटील याला अटक केली आहे. आरोपी संतोष पाटील यास शनिवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
 
फोनवर बोलतानाच झाला घातपात...
घटनेबाबत माहिती देताना मृत सिद्धारामच्या बहिणीने (लक्ष्मी) सांगितले की, रात्री सिद्धाराम हा त्याच्या पत्नीशी फोनवर बोलत होता. पत्नीने फोन लाऊड स्पीकरवर ठेवल्यामुळे घरातील सर्वजण त्याचा आवाज ऐकत होते. बोलत असतानाच अचानक सिद्धाराम जोरात विव्हळल्याचा आवाज फोनमधून आला आणि त्याच क्षणी त्याच्यासोबत काहीतरी घातपात झाल्याची जाणीव आम्हाला झाली.
Advertisement

पूर्ववैमनस्यातून बोलावले आणि केला हल्ला...
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष पाटील याने सिद्धारामच्या पत्नीला तिच्या लग्नापूर्वी प्रपोज केले असता श्रुतीने त्यास नकार दिला होता. या कारणावरून संतोष पाटील हा चिडून होता. तसेच विशाल तिरूमल व संतोष पाटील यांच्यात सिद्धाराम यास ठार मारण्याचे बोलणे झाले होते.
 
याबाबत जाब विचारण्यासाठी शुक्रवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास सिद्धाराम हा अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील एका कंपनीसमोर गेला होता. तिथे दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी संतोषने सोबत आणलेल्या कोयत्याने सिद्धारामवर थेट हल्ला चढवला. सिद्धारामवर एकापाठोपाठ एक सपासप वार केले.
 
हा हल्ला इतका भीषण होता की, सिद्धाराम रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आणि सिद्धारामाला वाचवण्यासाठी गेलेले त्याचे भावजी प्रमोद पाटील यांच्यावरही आरोपीने कोयत्याने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Advertisement

 
वर्षभरापूर्वी झाला होता विवाह...

मृत सिद्धाराम कटप हा अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आलेला तरुण होता. कष्टाने रिक्षा चालवून तो कुटुंबाला हातभार लावत होता. अवघ्या एक वर्षापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. सिद्धारामच्या पश्चात आई, दोन बहिणी आणि पत्नी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने कटप कुटुंबावर डोंगर कोसळला असून, सुनील नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

आरोपीला बेड्या...
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी आपल्या फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि काही वेळातच मुख्य आरोपी संतोष पाटील याला बेड्या ठोकल्या. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे तपास करत आहेत.

 

 
 

 

Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.