For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नानावाडी रोड-सावगाव धरण भागात प्रेमीयुगुल-मद्यपींचा पुन्हा वावर

12:24 PM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
नानावाडी रोड सावगाव धरण भागात प्रेमीयुगुल मद्यपींचा पुन्हा वावर
Advertisement

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

Advertisement

बेळगाव : शहरापासून लगतच असलेल्या नानावाडी रोडवर पुन्हा एकदा प्रेमीयुगुल आणि मद्यपींचा वावर वाढू लागला आहे. इतकेच नव्हे तर निसर्गरम्य वातावरण असलेल्या सावगाव गावातील धरण परिसरातही प्रेमीयुगुल आणि नशेबाजांचा धिंगाण सुरू झाला आहे. याचा नाहक त्रास महिला तसेच ग्रामस्थांना सहन करावा लागत असून पोलिसांनी मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. गस्तीसाठी आलेल्या पोलिसांकडून संबंधितांना हटकण्याचा बनाव करत वरकमाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. नानावाडी परिसर गेल्या काही वर्षांपासून या ना त्या कारणावरून नेहमी चर्चेत आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी त्या ठिकाणी फिरावयास आलेल्या प्रेमीयुगुलाला काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर गावातील काही तरुणांना पोलिसांनी अटक केली. बाहेरून येणाऱ्या प्रेमीयुगुल व मद्यपींना आवर घालण्याऐवजी गावातीलच तरुणांना अटक करण्यात आल्याने या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढून निवेदन दिले होते.

तेव्हापासून पोलिसांनी दिवसा तसेच रात्रीच्या वेळी नानावाडी रोड आणि सावगाव गावातील धरण परिसरात गस्त वाढवली होती. त्यामुळे काही दिवस या परिसरातील प्रेमीयुगुल आणि नशेबाज तरुणांचा उच्छाद कमी झाला होता. पोलिसांनी गस्त कमी केल्याने पुन्हा एकदा धिंगाणा सुरू झाला आहे. अधूनमधून पोलीस 112 या गस्तीच्या वाहनावर येत असतात. मात्र, जे कोणी सापडतील त्यांना हटकून त्यांना कारवाईची धमकी दाखवत वरकमाई करण्यात गुंतले असल्याचे बोलले जात आहे. सापडलेल्या प्रेमीयुगुलांकडून रोख किंवा युपीआयच्या माध्यमातूनही पैसे वसूल करत असल्याचा आरोप केला जात आहे. या सर्व प्रकाराबाबत ग्रामस्थ पुन्हा एकदा संतप्त बनले असून पोलिसांनी या सर्व प्रकारांवर आळा न घातल्यास पुन्हा एकदा जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेत नानावाडी रोड व सावगाव धरण परिसरात दिवसा तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवण्याची सूचना करावी, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement

रविवारी सुरू असतो धिंगाणा

आठवडाभर नानावाडी रोड व सावगाव धरण परिसरात दिवसा आणि रात्रीच्या वेळी प्रेमीयुगुल व मद्यपींचा वावर असतो. निसर्गरम्य धरण परिसरात ओल्या पार्ट्या केल्या जातात. त्या ठिकाणीच बिअरच्या बाटल्या फोडण्याचे प्रकारही घडत आहेत. विशेष करून रविवारी सकाळपासूनच परिसरात प्रेमीयुगुल आणि मद्यपींचा वावर सुरू होतो. त्यामुळे शेताला जाणाऱ्या महिला व ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.

Advertisement
Tags :

.