हौसेने केला पती (राष्ट्र) त्याला...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या करामती, कसरती आज थांबतील उद्या थांबतील असे सारे अंदाज धुळीला मिळाले आहेत. मराठीत एक म्हण आहे ‘हौसेने केला पती(राष्ट्र)त्याला भरली ....’ अगदी असेच म्हणायची वेळ अमेरिकेसह जगभरच्या गुंतवणूकदार व राज्यकर्त्यांवर आली आहे. याचा शेवट काय होणार माहिती नाही. हे कशासाठी हे कळत नाही. एकूणच सारे कठीण झाले आहे. जगभर मोठ्या मंदीची, प्रचंड बेरोजगारीची आणि व्यापार युद्धाची चर्चा सुरु झाली आहे. अमेरिकन कंपनी मायक्रोसॉफ्टसह अमेरिकेतील सर्व बड्या कंपन्या आणि जगभरचे शेअर मार्केट रोज नवा तळ दाखवते आहे. टाटा, रिलायन्स, स्टेटबॅंक यासह भारतीय शेअर बाजारातील महत्त्वाच्या कंपन्यांचे बाजारमूल्य प्रचंड घसरले आहे. रोज त्या घसरणीत भर पडते आहे. ही एकत्रित घसरण किती तरी लाख कोटी आहे. म्हणजे एकावर किती शुन्ये हे मोजणे, समजणे येरागबाळ्याचे काम नाही. थोडक्यात लाखाचे बारा हजार झाले आहेत. ट्रंप यांची दुसरी टर्म सुरु व्हावी म्हणून अनेकांनी मदत केली. अमेरिकेतील भारतीयांनी आणि तेथे स्थिरावलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांनी ट्रंपच्या विजयात मोठा हातभार लावला होता. ट्रंप विजयी झाले आणि सत्तारूढ झाले तेव्हा त्यांचे खरे दात आणि विध्वंसक वृत्ती समोर आली. मोदी आणि त्यांची मैत्री, भारताबद्दलचे त्यांचे प्रेम, मोदींना ते मारत असलेल्या मिठ्या किती नाटकी, बेगडी आणि फसव्या होत्या याचा प्रत्यय त्यांच्या कृतीतून आणि उक्तीतून येत आहे. 2 एप्रिलला ते भारतातून अमेरिकेत येणाऱ्या आयातीवर किती टेरिफ लावायचे याची घोषणा करणार आहेत पण त्या आधी त्यांनी केलेले एक विधान भारतीयांना ठेच पोहचवणारे आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार काही छुपा नाही. वर्षानुवर्षे सुरु आहे. त्यावरील आयात व निर्यात शुल्क ठरवून त्याप्रमाणे आयात निर्यात होत आली आहे. पण ट्रंप यांनी भारत आयात शुल्क जास्त आकारतो व निर्यात शुल्क अत्यल्प देतो असे म्हणताना आपण भारताला एक्सपोज करतो असा शब्द वापरला, हा शब्द अत्यंत हिनपणे वापरला गेला आहे, तो माफीसह मागे घेतला पाहिजे या शब्दावर देशात तीव्र नापसंती आहे पण मोदी सरकारने या बाबतीत अजूनतरी निषेध नोंदवलेला दिसत नाही. आपले परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि व्यापार मंत्री पियुष गोयल आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. ट्रंप 2 एप्रिलला भारतासंदर्मात टेरिफचा काय निर्णय घेतात त्यावर भारत पावले उचलणार आहे पण भारत आता पूर्वीचा नाही, लेचापेचा नाही याचे भान अमेरिकेसह सर्वांनी ठेवले पाहिजे. भारताने अटलजी पंतप्रधान असताना पोखरणला अणू चाचणी केली होती. धमाका झाला. बुद्ध हसला मिशन फत्ते झाले आणि अमेरिकेसह पाच प्रगत देशांनी भारतावर आर्थिक बंदी घातली. गयावया करत माफी मागतील अशी बंदी मागची धारणा होती पण या बंदीचे स्वागत अटलजांनी आणखी एक धमाका अर्थात अणू चाचणी केली. आणि जगभर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कार्यरत असलेल्या भारतीयांनी आपला धनसंचय डॉलरमध्ये भारतात वळवला. जशी बंदी घातली तशी ती निमूटपणे मागे घेतली गेली, ट्रंप यांनी आज पुन्हा व्यापार युद्ध भारताबरोबर सुरु केले तर ट्रंप गेला तेल लावत या भूमिकेत भारत येऊ शकतो. भारतीयांना निर्यातीला आणि आयातीला जगाची बाजारपेठ खुली आहे. भारताने जगाशी चांगले नाते जोडले आहे. ब्रिक्स सारख्या व्यासपीठाचे नेतृत्व भारत करत आहे आणि अमेरिकेतील अनेक उद्योगाचे प्रमुख भारतीय आहेत. जग विस्तृत आहे. खुले आहे आणि जगात बुद्धिमत्तेला, कष्टाला, कौशल्याला आणि बाजारपेठेला महत्त्व आहे याची जाण ट्रंप यांच्यासह सर्वांनी ठेवली पाहिजे. ट्रंपनी कॅनडावर टेरिफ 25 टक्के लावले आहे त्यानीही जशास तसे या न्यायाने अमेरिकेवर टेरिफ वाढवले आहे, सर्वत्र हेच होत आहे व होणार आहे. ट्रंप यांनी कॅनडाला असे सुनावले आहे की आम्ही शंभर टक्के टेरिफ लावणार, तूम्हाला टेरिफ शुन्य हवे असेल तर एकच मार्ग आहे तुम्ही अमेरिकेचे 51 वे राज्य म्हणून अमेरिकेत सहभागी व्हा.
ट्रंप यांनी सहज गंमतीने हे विधान केले असे मानले तरी त्यातून मानसिकता आणि साम्राज्यवादी वृत्ती दिसून येते. जगातील एक मोठी शक्ती असलेल्या अमेरिकेसारख्या राष्ट्राचा प्रमुख असे बाष्कळ विधान करेल असे म्हणता येणार नाही पण ते त्यांनी केले हे वास्तव आहे. ओघानेच अमेरिकेच्या मनात काय आहे. ट्रंप यांना काय साधायचे आहे आणि जग यावर कशी प्रतिक्रिया देणार असे अनेक प्रश्न आहेत पण ट्रंप यांची बडबड, निर्णय यामुळे अमेरिका आणि तेथील शेअर बाजार, व्यापार, उद्योग अडचणीत येताना दिसतो आहे. दीर्घकालीन हितासाठी हे सोसले पाहिजे असे ट्रंप यांचे म्हणणे आहे. पण महागाई, बेरोजगारी, अडचणीत आलेली गुंतवणूक आणि समोर दिसणारा अंधार यामुळे अमेरिकेत चिंतेचे वातावरण आहे. जगभरही अनिश्चितता निर्माण झाली आहे. कालचा दिवस बरा असे म्हणायची वेळ सर्वांवर आली आहे. जगाने एक होऊन ट्रंपला धडा शिकवणे हाच यावर मार्ग आहे. भारत, चीन या जगातल्या मोठ्या बाजारपेठा आहेत. ट्रंप या दोन्हीसह अनेकांशी पंगा घेत आहेत. व्यापार युद्ध तर त्यांनी सुरुच केले आहे पण युक्रेनला अंतराळी करत धोरण बदलले आहे. व्यापार युद्ध कशी पावले टाकते यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. 2 एप्रिल रोजी ट्रंप भारतासंदर्भात काय निर्णय घेतात हे कुणालाच सांगता येत नाही. पण त्यांनी चुकीचे निर्णय घेतले तर भारत आणि भारतवासी लेचेपेचे नाहीत याची प्रचिती त्यांना आल्याशिवाय राहणार नाही. भारत ही जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनणार, भारताला कोणी अडवतो म्हटले तरी ते शक्य होणार नाही. मोठी बाजारपेठ, लोकशाही, जगभर उत्तम संपर्क, सर्वात तरुण देश अशी भारताची प्रतिमा आहे. तिला कोणी नख लावू शकत नाही, ट्रंपना धडा मिळाला की शहाणपण येईल. तूर्त अमेरिकेतील नागरिकांना हौसेने केला पुन्हा राष्ट्रपती त्याची फिरली मती असे म्हणायची वेळ आली आहे. अर्थमंत्र्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर पावले टाकत भारतीय भांडवली बाजार तात्काळ सावरण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जोडीला विदेशातील भारतीयांनी आपली गुंतवणूक भारतात करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.