पलूसमध्ये डॉल्बीचा दणदणाट
पलूस :
गणेशोत्सवामध्ये 'काय' दयाचा देखावा सादर करून पलूस शहरात मोठ्या प्रमाणात डॉल्बी वाजला. डॉल्बीवर बंदी असताना पलूस शहरात सर्व नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होत्या. पोलीस यंत्रणा मात्र कानात बोटे घालून उभी होती.
बुधवारी पलूस शहरातील गणेश मंडळाची सातव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी मिरवणुकीत सर्व नियम धाब्यावर बसवत डॉल्बीचा दणदणाट झाला. नियमाचे पालन करून गणेशोत्सवात डॉल्बीचा बेसला मर्यादा घालून देण्यात आली होती. याचे कुठेही पालन न झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांतून संताप व्यक्त होत होता.
पलूस शहरात पोलीस आहेत का नाही इथपर्यंत त्यांनी भावना व्यक्त केल्या. मोठया प्रमाणात आवाजात डॉल्बी लावून रस्त्यावरून मिरवणुका निघत होत्या. डॉल्बीच्या आवाजामुळे वृध्द व लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. घरातील आजारी व्यक्तींनाचा याचा त्रास होत असताना डॉल्बीवर कारवाई करण्यात आली नाही
रात्री नऊ वाजेपर्यत मंडळाच्या मिरवणुका प्रमुख रस्त्यावरून जात होत्या. त्यास पोलीस बंदोबस्त देखील होता हे विशेष म्हणावे लागेल. सर्वत्र गणेश उत्सव मोठया उत्साहाने साजरा केला जातो. पारंपरिक वाद्यांनी गणेशाचे आगमन झाले. पलूस शहरात शंभरहून अधिक मंडळे आहेत. प्रत्येक मंडळाची मिरवणूक निघते. त्यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यावरून आमणापूर, किंवा ताकारी या ठिकाणी गणेश मुर्ती विसर्जन केली जाते.
गणेश विसर्जन मिरणूक सुरू असताना हजारो तरूणांच जनसमुदाय डॉल्बीच्या तालावर नाचत असतो. डॉल्बीच्या आवाजामुळे अनेकवेळा लोकांच्या कानाचे पडदे फाटले आहेत. अशा घटना पलूस मध्ये वारंवार घडल्या आहेत. तरी देखील गणेशोत्सव काळात डॉल्बीचा दणदणाट सुरू असल्याने नागरीकांतून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. कायदयाने डॉल्बीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे