‘गंगोत्री’पासून ‘गंगासागरा’पर्यंत कमळ
भाजपच्या प्रचंड विजयाने भारावले पंतप्रधान मोदी
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘मतदारांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम यांच्यामुळे आज देशात पवित्र गंगानदीचे उगमस्थान असणाऱ्या ‘गंगोत्री’पासून ते गंगानदी सागराला मिळते त्या ‘गंगासागर’पर्यंत सर्वत्र भारतीय जनता पक्षाचे ‘कमळ’ फुलले आहे, अशा भावपूर्ण शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या प्रचंड विजयाची प्रशंसा केली आहे. ते येथील भारतीय जनता पक्ष मुख्यालयात सहस्रावधी कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांच्या विधानसभा निवडणुकांच्या परिणामांचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी विजयोत्सवात भाग घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून हे ओजस्वी भाषण केले.
‘आज मी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम्, आसाम आणि पुद्दुचेरी यांच्या मतदारांसमोर विनम्र भावनेने नतमस्तक होत आहे. या निवडणुकांमध्ये आपल्या कठोर परिश्रमाच्या माध्यमातून पक्षाला विजयी करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनाही मी वंदन करीत आहे. लक्षावधी कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत जणू चमत्कार घडविला आहे. त्यांच्या घामानेच पक्षाचे कमळ फुलले आहे,’ असे प्रतिपादन त्यांनी केले.
बिहार ते गंगासागर
गेल्या नोव्हेंबरात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारमध्ये मोठा विजय मिळविला. त्याचवेळी मी आपल्यासमोर स्पष्ट केले होते, की गंगा बिहारमधून गंगासागर पर्यंत वाहते. ती सूचक विधाने आज खरी ठरली आहेत. पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचा विजय हा खरोखरच संस्मरणीय आहे. गंगा नदी ज्या राज्यांमधून वाहते, त्या उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार आणि आता पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आज भारतीय जनता पक्ष-राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सरकारे आहेत, हा योगायोग विलक्षण आहे. हे यश कष्टसाध्यच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जनता क्षमा नाही करत
ज्यांनी जनतेला गृहित धरले, सत्तेचा अनिर्बंध दुरुपयोग करुन जनतेला संकटात टाकले आणि स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरले त्यांना जनता कधीच क्षमा करत नाही, हा अनुभव पुन्हा एकदा या निवडणुकांच्या परिणामांमधून येत आहे, अशा अर्थाची खोचक टिप्पणीही त्यांनी केली. केवळ काही राज्यांमधील विधानसमा निवडणुकांमध्येच नाही, तर अनेक राज्यांमधील पोटनिवडणुकांमध्येही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीने विजय मिळविला असून त्यामुळे पक्षाचा देशव्यापी विस्तार दिसून येतो, असेही गौरवोद्गार त्यांनी काढले.
मुखर्जी यांच्या स्मरणाने सद्गदित...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे आवर्जून स्मरण केले. मुखर्जी यांनी पश्चिम बंगाल भारताला मिळावा, यासाठी महत्वाचे योगदान केले आहे. यासाठी यांनी मोठा संघर्ष केला. त्यांनी बलवान आणि वैभवी वंगप्रदेशाचे स्वप्न पाहिले होते. आज, आम्हाला ते स्वप्न पूर्ण करण्याची संधी या राज्याच्या जनतेने दिली आहे. या राज्याच्या वर्तमानात आज एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. व्यक्तीश: मी आणि केंद्र सरकार पश्चिम बंगालच्या विकासासाठी जे करता येणे शक्य आहे, ते सर्व करु. जनतेने यासंबंधीं शाश्वती बाळगावी, असे महत्वपूर्ण प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
काँग्रेसवरही टिप्पणी
जे साम्यवादी तत्वज्ञान आज साऱ्या जगाने नाकारल्याने अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे, तेच तत्वज्ञान स्वीकारण्याचा अव्यवहार्यपणा राहुल गांधी करीत आहेत. जो माओवाद आता भारतातील वनांमध्ये संपत आहे, तो आता काँग्रेसमध्ये बळकट होत आहे, हे योग्य नव्हे, अशी टिप्पणी त्यांनी काँग्रेसला उद्देशून केली.
भावपूर्ण पण ठाम विचार व्यक्त
ड जनतेला गृहित धरणाऱ्या शक्ती कितीही मोठ्या असल्या तरी नाही क्षमा
ड भारतीय जनता पक्षाचे आजचे यश हा कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचाच परिणाम
ड श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्वप्नांची पूर्ती करण्याची संधी आज आम्हाला
ड पश्चिम बंगालच्या विकासासाठी शक्य ते सर्व प्रयत्न निर्धारपूर्वक करणार
ड भारतीय जनता पक्षाचे ध्येय बदला नव्हे, तर बदल हे आहे असे प्रतिपादन