For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरविलेली पर्स सापडली 63 वर्षांनी

06:22 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
हरविलेली पर्स सापडली 63 वर्षांनी
Advertisement

जेव्हा आपली नेहमीच्या उपयोगातील वस्तू हरविते, तेव्हा आपल्याला बरीच चुटपुट लागून राहते, हा प्रत्येकाचा अनुभव आहे. त्या वस्तूच्या किमतीपेक्षाही ती आपल्या हातून हरविली कशी, याचेच दु:ख जास्त असते. विशेषत: त्या वस्तूवर आपला जीव असेल किंवा कोणा प्रिय व्यक्तीच्या आठवणीशी ती वस्तू निगडीत असेल तर ती हरविल्यानंतर बरेच दिवस आपण बेचैन आणि उदास रहातो.

Advertisement

काहीवेळा अशा हरविलेल्या वस्तू, त्या विस्मृतीत गेल्यानंतर, अचानक आणि अनपेक्षितरित्या सापडतात. तेव्हा आपल्याला जणू धनाचा ठेवा हाती आल्यासारखे वाटते. अशीच घटना पॅटी रमफोला या एका विद्यार्थिनीच्या संदर्भात घडली आहे. या विद्यार्थिनीला अत्यंत प्रिय असणारी पर्स 1957 मध्ये तिच्या शाळेत हरविली होती. ही विद्यार्थिनी अमेरिकेतील ओहियो प्रांतातील होती. नॉर्थ कँटल मिडल स्कूल या शाळेतून ही पर्स हरविली होती. पॅटीने ती शोधण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. तथापि, ती सापडली नाही. अखेर या पर्सची आठवण मागे टाकून या विद्यार्थिनीने आपला जीवनक्रम पुढे सुरु ठेवला. कालांतराने पर्स विस्मृतीत गेली.

तथापि, 2019 मध्ये तब्बल 63 वर्षांनी याच शाळेचे नूतनीकरण करण्यात येत असताना ही पर्स सापडली. त्यानंतर ही पर्स कोणाची याचा शोध घेण्यात आला. तथापि, पॅटी रमफोला यांचे 2013 मध्येच निधन झाल्याची माहिती हा शोध घेताना मिळाली. ही पर्स उघडून पाहिली असता तिच्यात मेकअपची साधने, सार्वजनिक वाचनालयाचे सदस्यत्व कार्ड, काही जुनी कृष्णधवल छायाचित्रे इत्यादी वस्तू आढळून आल्या. तसेच 26 सेंट्स् इतकी रक्कम आणि 1956 च्या शालेय फुटबॉल स्पर्धेची कार्यक्रमपत्रिकाही या पर्समध्ये होती. वाचनालयाच्या कार्डवरुन ती पर्स कोणाची होती याचा शोध लागला. पॅटी रमफोला यांनी 1960 मध्ये या शाळेतून शिक्षण पूर्ण केले होते. 1980 मध्ये त्यांचा विवाह झाला होता आणि त्यांना पाच मुलेही नंतर झाली. 2013 मध्ये त्यांचे निधन झाले. ही माहिती शोधकार्यातून मिळाली. आता ही पर्स त्यांच्या मुलांना देण्यात आली आहे. आपल्या मातेची ही अचानक हाती आलेली आठवण पाहून मुलांनाही आनंद झालेला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.