Chandgad News | प्रामाणिकपणाचा जिताजागता पुरावा: कारवे येथील दोन मित्रांनी परत केले नदीत सापडलेले चांदीचे कडे!
चंदगड : आजच्या धावपळीच्या आणिस्वार्थी युगातही प्रामाणिकपणा आणि माणुसकी जिवंत असल्याचे उदाहरण कारवे येथे पाहायला मिळाले. कारवे येथील पर्यावरणप्रेमी धर्मेंद्रभाई पटेल आणि नितीनभाई पोवार या दोन मित्रांनी नदीपात्रात सापडलेले सुमारे साडेसहा तोळे वजनाचे चांदीचे कडे त्यांच्या मालकाला परत करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
कारवे येथील प्रशांत बोकडे हे महिनाभरापूर्वी आपल्या मुलीला पोहायला शिकवत असताना जवळच्या नदीपात्रात त्यांचे चांदीचे कडे हरवले होते. बराच शोध घेऊनही कडे सापडले नाही. ही बाब त्यांनी नियमित त्या परिसरात पोहण्यासाठी जाणारे धर्मेंद्रभाई पटेल आणि नितीनभाई पोवार यांना सांगितली होती. यावर्षी पावसाने उशीर केल्याने नदीपात्रातील पाणी कमी होऊ लागले. नुकतेच नदीपात्रात फिरतअसताना धर्मेंद्रभाई पटेल आणि नितीनभाई पोवार यांना ते हरवलेले चांदीचे कडे आढळून आले.
कडे सापडताच या दोघांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट प्रशांत बोकडे यांच्या घरी जाऊन ते कडे त्यांच्या स्वाधीन केले. हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने प्रशांत बोकडे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कृतज्ञतेपोटी त्यांनी या दोघांना रोख बक्षीस देण्याचा प्रयत्न केला, मात्र धर्मेद्रभाई आणि नितीनभाई यांनी ते नम्रपणे नाकारत प्रामाणिकपणाच खरा सन्मान असल्याचे दाखवून दिले.