मांजरीमुळे गमावली नोकरी !
ही चीनमधील एक गंमतशीर घटना आहे. या देशाच्या चोंगकिंग नामक शहरात ली वांग 25 वर्षीय नामक महिला एका खासगी कंपनीत कामाला होती. तिला मांजरे पाळण्याचा मोठा छंद आहे. तिच्या घरात 9 मांजरे आहेत. काही कारणामुळे ही महिला नोकरी सोडण्याचा विचार करीत होती. तिने आपले त्यागपत्र आपल्या मोबाईलवर ड्राफ्ट करुन ठेवले होते. ते ती आपल्या अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे पाठविणार होती. पण नोकरी सोडावी की न सोडावी या विचारात तीन मग्न असतानाच तिच्या एका मांजरीने तिच्या मांडीवर उडी मारली. मांजरीचा पंजा नेमका तिच्या मोबाईलच्या ‘एंटर’ या बटणावर पडला आणि क्षणार्धात तिचे त्यागपत्र तिच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचले. हे लक्षात येताची ती प्रचंड घाबरली. कारण तिने त्यागपत्राचा ड्राफ्ट सज्ज ठेवला असला तरी तो पाठविण्याचा निर्णय घेतला नव्हता. तिला पैशांची आवश्यकताही होती. त्यामुळे नोकरी सोडू नये, असाही विचार तिच्या मनात बळावत असतानाच हा प्रकार घडला होता.
तिने त्वरित कार्यालयात पोहचून आपल्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला आणि त्याच्यासमोर झालेला प्रकार स्पष्ट केला. तथापि, अधिकाऱ्याने त्यावर विश्वास ठेवला नाही. त्याने तिचे त्यागपत्र परत घेण्याची अनुमती तिला दिली नाही. परिणाम असा झाला की तिला नोकरी गमवावी लागली. एवढेच नव्हे, तर तिच्या वर्षाअखेरीस मिळणाऱ्या बोनसवरही तिला पाणी सोडावे लागले. आता हात चोळत बसण्याची वेळ तिच्यावर आली आहे. ही घटना मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे.