पैशाच्या पावसाच्या हव्यासापायी गमावले 36 लाख
सातारा :
सध्याचे विज्ञान युग आहे. मात्र, या जगात आजही भोंदूगिरी करणारे आपल्या आजुबाजुबला पहायला मिळतात. माण तालुक्यातील देवापूर गावचे कांता वामन बनसोडे हे सेवानिवृत्त आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपीक हे मंगेश भागवत या एका भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकले. त्या भोंदू बाबाने पैशाचा पाऊस पाडुन देतो अशी बतावणी करुन तब्बल 36 लाख रुपयांना फसवले असून त्या भोंदू बाबाला म्हसवड पोलीस अभय देत आहे. त्यामुळे न्यायासाठी म्हसवड पोलीस ठाण्याच्या दारातच बनसोडे हे 6 जानेवारी रोजी उपोषणाला बसणार आहेत.
बनसोडे यांनी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन दिले आहे,. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बनसोडे हे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसवड येथून कनिष्ठ लिपीक या पदावरुन सेवानिवृत्त झाल्यानंतर ते शेती करतात. त्यांचे मित्र सर्जेराव वाघमारे हे मायाक्का देवीचे पुजारी असल्याचे सांगून त्यांनी त्यांचे मित्र मंगेश भागवत (रा. कळंस, ता. इंदापुर) हे पैशाचा पाऊस पाडून देतात. त्यांच्याकडे दैवी शक्ती आहे, अशी बतावणी करुन त्यांच्याकडे दि. 2 एप्रिल 2023 रोजी घेवून गेले. भागवत याने त्यासाठी पुजेचे साहित्य आणण्याकरता ऑनलाईन व ऑफलाईन अशी 36 लाख रुपयांची रक्कम घेतली. त्यावेळी हरीभाऊ काटकर, काशिनाथ शेलार, सुनील धोत्रे, आनंदा पिंपळदरे यांनाही वाघमारे याने बोलवून घेतले. त्यांच्यापैकी काटकर यांनी 2 लाख, पवार यांनी 4 लाख, धोत्रे यांनी 2 लाख आणि पिंपळदरे यांनीही 8 लाख दिले.
कांता बनसोडे हे दि. 11 फेब्रुवारी 2024 रोजी भागवतच्या घरी गेले. त्यांच्या घरात काळुबाईच्या देवीसमोर सहा बंदिस्त बॉक्स बनसोडे यांना देवून त्यात 30 कोटी आहेत. ते 21 व्या दिवशी उघडा असे त्याने सांगितल्याने 21 व्या दिवशी बॉक्स उघडल्यावर त्यातून निघाली पेपरची रद्दी. मग बनसेडे यांनी फोन करुन भागवत आणि वाघमारे यांना संपर्क करुन रद्दी निघाल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी बॉक्स आणून द्या. तुमचे पैसे देतो असे सांगितले. मात्र, दि. 6 मार्च 2024 पासून पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली. त्यावरुन म्हसवड पोलीस ठाण्यात दि. 2 ऑगस्ट रोजी लेखी तक्रार केली. परंतु त्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली नाही. म्हसवड पोलीस ठाण्याचे अधिकारी बिराजदार आणि वाघमोडे यांनी भागवत याच्याशी हातमिळवणी केल्याचे समजते. त्यामुळे न्यायासाठी दि. 6 जानेवारी रोजी म्हसवड पोलीस ठाण्याच्या समोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.