अतिवृष्टीमुळे घर कोसळून तीन लाखाचे नुकसान
राजापूर-भरडे येथील घटना
शहर वार्ताहर/ राजापूर
राजापूर तालुक्यात गेले दोन दिवस विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भराडे शिंदेसेना शाखाप्रमुख सागर जाधव यांचे घर शुक्रवारी झालेल्या वादळ व अतिवृष्टीमुळे कोसळून सुमारे ३ लाखाचे नुकसान झाले. सुदैवाने घरात कोणी नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
परतीच्या पावसाने राजापूर तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पडझड झाल्याच्या घटना घडल्या. तर काही नागरिक किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. शेती कापणीयोग्य झाली असून काही ठिकाणी भातकापणीला सावातही झाली होती. अशातच परतीच्या पावसाने जोर धरल्याने भातकापणीची कामे रखडली आहेत. तर काही शेतकऱ्यानी कापलेले भात पावसामुळे भिजल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. शुक्रवारी नाटे परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टीत सागर जाधव यांचे घर मध्यरात्री १. ३० च्या सुमारास पूर्णत: कोसळून पडले. जाधव यांचे घर कोसळून पडल्याची माहिती मिळताच विभागप्रमुख मनोज आडविरकर, युवासेना विभागप्रमुख अजित बंडबे, महिला विभागप्रमुख स्वरा भोसले व राजवाडी पानेरेचे शाखाप्रमुख तुषार बंडबे यांनी जाऊन पाहणी केली. दरम्यान, पणेरे येथील काही घरातील वीजमीटरही जळून खाक झाले आहेत.