For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वसतिगृह प्रवेश प्रक्रिया लांबल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

10:34 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
वसतिगृह प्रवेश प्रक्रिया लांबल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान
Advertisement

ऑनलाईन प्रक्रियेमुळे विलंब, पालकांची फरफट : शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना राबवणे गरजेचे : आमदारांनी लक्ष घालण्याची मागणी

Advertisement

खानापूर : तालुक्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी सरकारने वस्तिगृहांची सोय केलेली आहे. मात्र वसतिगृहातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात राहण्याची अद्याप सोय न झाल्याने शाळेसाठी विद्यार्थ्यांची आणि पालकांची फरफट होत असून शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्यातील गवाळी, पास्टोली, मेंडील, कोंगळा, आमगाव, तळावडे, तळेवाडी,   शिरोली भागातील काही गावातून तसेच तालुक्याच्या इतर ग्रामीण भागातील विद्यार्थी माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी वसतिगृहात राहून शिक्षण घेतात. यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी शाळेतून प्रवेश घेतला असून सर्व शाळांतून अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे. मात्र वसतिगृहात अद्याप प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सोय करण्यात आली नाही. विद्यार्थ्यांना या दुर्गम भागातून येणे-जाणे सोयीचे नसल्याने काही पालक रोज चाळीस-पन्नास कि. मी. चा प्रवास करून आपल्या मुलांना दुचाकीवरुन आणत आहेत. मात्र सर्वच विद्यार्थ्यांना ते शक्य नसल्याने काही विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविली आहे. वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन असल्याने प्रवेश प्रक्रिया लांबली आहे. त्यामुळे वसतिगृहाचे संचालक या विद्यार्थ्यांना वसतिगृहात ठेवून घेण्यासाठी नकार देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तातडीने बैठक घेऊन वसतिगृहाच्या संचालकांना सूचना कराव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

बस सुविधा नसल्याने वसतिगृहाचा आधार

Advertisement

तालुक्यात मागासवर्गीय विभागाची आठ वसतिगृहे आहेत. त्यापैकी तीन खानापूर शहरात आहेत. त्यामध्ये दहावीपूर्व मुलांचे वसतिगृह, दहावीपूर्व मुलींचे वसतिगृह आणि दहावीनंतरच्या शिक्षणासाठी मुलींकरिता एक वसतिगृह आहे. तर हलशी, लोंढा, शिरोली, इटगी आणि जांबोटी येथे दहावीपूर्व मुलांच्या वसतिगृहांची सोय आहे. तालुक्याच्या दुर्गम भागात अनेक ठिकाणी माध्यमिक शिक्षणाची सोय नाही. कोंगळा, गवाळी, माण, सडा, हुळंद, आमगाव या भागातील विद्यार्थ्यांना वसतिगृहांवर अवलंबून राहावे लागते. अनेक गावांना बस सुविधा नाही. त्यांच्या शिक्षणाचा वसतिगृह हा एकमेव आधार आहे. कोंगळा, गवाळी व पास्टोली भागातील विद्यार्थ्यांसाठी शिरोली येथे दहावीपूर्व केवळ मुलांचे वसतिगृह आहे. त्यामुळे मुलींसाठी खानापूर येथील वसतिगृहावरच अवलंबून राहावे लागते. जांबोटी-हेम्माडगामधील विद्यार्थिनींना प्रवेशासाठी वाट पहावी लागते. त्याकरिता मुलींच्या वसतिगृहाची क्षमता वाढवणे आवश्यक आहे.

शिरोली-कणकुंबीत वसतिगृहांची गरज

शाळा सुरू झाली असली तरी वसतिगृह प्रवेश निश्चित झाला नसल्याने मुलांना शाळा सोडून घरी बसावे लागत आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही. ती त्वरित सुरू करावी, अशी विद्यार्थी व पालकांची मागणी आहे. वसतिगृहांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. शिरोली येथे मुलींचे वसतिगृह आणि कणकुंबी या ठिकाणी मुली व मुलांचे वसतिगृह सुरू करावे, अशी मागणी पालक जयवंत गावकर यांनी केली आहे.

नुकसान टाळण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज

ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होऊन विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील प्रवेश निश्चित होण्यास महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.त्यामुळे  विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेश निश्चित होईपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. शहरातील एखादे मंगल कार्यालय अथवा निवासाची सोय असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था केल्यास त्यांचे आगामी महिनाभराचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

Advertisement
Tags :

.