लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ताब्यात
कागल तपासणी नाका आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई
मोर्चा काढण्यास परवानगी नाही
कोल्हापूर
कागल येथील आरटीओ तपासणी नाक्याचे खासगीकरण करण्यात आले आहे. हा खासगी तपासणी नाका बंद करा या मागणीसाठी लॉरी ऑपरेटर असोसिएशन सोमवारी सकाळी महामार्गावर आंदोलन करणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री दहा वाजता असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव आणि सचिव हेमंत डिसले यांना राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांना पोलीस ठाण्यात थांबून ठेवण्यात आले होते.
कागल येथे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी नवा नाका सुरू करण्यात आला आहे. हा नाका खासगी असून याला वाहतूकदारांचा विरोध आहे. आपला विरोध दर्शवण्यासाठी लॉरी ऑपरेटर असोसिएशन ट्रक आणि टेम्पो घेऊन महामार्गावर मोर्चा काढणार आहेत. मात्र याला पोलीस प्रशासनाने परवानगी दिली नाही. या पार्श्वभूमीवर रविवारी 8 वाजता राजारामपुरी पोलीस असोसिएशनच्या ऑफिसमध्ये गेले. यावेळी येथे अध्यक्ष सुभाष जाधव आणि सचिव हेमंत डीसले होते. पहिल्यांदा जाधव यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास डिसले यांनाही पोलीस ठाण्यात बोलवून घेण्यात आले. दोघांनाही रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. दरम्यान दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हाभर पसरली. त्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये वाहतूकदारांचे फोन येऊ लागले. काही राजकीय नेत्यांनी यामध्ये हस्तक्षेप करणारा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत दोघेही पोलिस ठाण्यात थांबून ठेवण्यात आले होते.