शिव के मन शरण हो...
हे नटराज नटेश्वर अभयद
स्वरमय शुभमय हे शिव सौख्यद
आदिगुरु आदिनाथ, संगीताचा उद्घाता, अनादि अनंत असणारा महादेव नास्तिकांनासुद्धा कधी टाळत नाही. तो खरंच भोळा देव म्हणायचा! कारण काही विचार न करता, केवळ अनन्यभावाने त्याची भक्ती करणाऱ्या राक्षसांनासुद्धा नको ते वरदान देऊन अडचणीत आणतो सगळ्यांना! काय म्हणावं या देवबाप्पाला?
शिवशंकर महादेव हर हर
नीलकंठ हाथ त्रिशूल गंगाधर
असं देसीकारात आळवायचं त्याला? की मग
शंकर भोला रे नाथ भज मन
असं थेट दुर्गा रागामध्ये स्तुती करायची त्याची? तसं पाहिलं तर राग भैरव थाट भैरव हे साक्षात शिवाचं स्वरूप मानले गेलेले आहे. कारण शिवतत्त्व खऱ्या अर्थाने गूढ आणि अनादि आहे. त्याचा कोणीही जन्मदाता नाही. त्याला अंत नाही. त्याचा वास हा सदैव स्मशानात त्याला कायमची सोबत ही भूतगणांची! भैरव, वेताळ, वीरभद्र ही त्याची सेना. म्हणावं तर तो कापालिक म्हणजे चक्क मुंडमाला घालून राहणारा. चिताभस्म अंगाला आवडीने लावणारा. ज्याला पंचामृताशिवाय म्हणजेच जगातल्या शुद्ध आणि सात्त्विक वस्तूंशिवाय वेगळं, साग्रसंगीत असं नैवेद्यालासुद्धा काही नको असतं. साध्या दहीभातावर सुद्धा जो भक्तावर खुश होतो, आणि संतापला तर एका क्षणात साऱ्या जगाचं भस्म करून टाकेल एवढा प्रचंड ज्याचा संताप असतो, अशा या दैवताला चौकटीत बसवायचं तर कुठल्या चौकटीत? खरंतर कुठल्या चौकटीत न बसणं हेच त्याचं वैशिष्ट्या. त्याला व्योम असंही म्हणतात. म्हणजे जो आकाशासारखाच निळा आहे, आणि जो आकाशासारखाच अनंत आहे तो हा महादेव शिव!
पार्वतीपरमेश्वर, अर्थात शिवपार्वती, ही जगाची पितरे मानली जातात. म्हणजेच जगन्माता पार्वती आणि जगाचा जन्मदाता शंकर. पार्वतीमातेच्या सहवासाशिवाय या देवाचं पान हलत नाही. प्रेमातली उत्कटता आणि उग्रताही काय आणि किती असावी! याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे शिवपार्वती दाम्पत्य होय. पार्वतीमाई वगळता जगातल्या प्रत्येक स्त्राrचं पालन ही देवता करते ते पिता म्हणूनच. दक्षकन्या सती आणि शिव यांची उत्कट प्रेमकथा ही जगातली आद्य प्रेमकथा ठरावी. ती अतिशय रोचक आहे.
शंकराच्या प्राप्तीसाठी सतीने अक्षरश: आकाशपाताळ एक केलं. थंडी, वारा, ऊन, पाऊस ही सर्व दु:खं अविचलपणे सहन करत ती तप करत राहिली. चौसष्ट वर्षं ती झाडाची पिकली पानं खाऊन होती. म्हणजे झाडाच्या जिवंत पानावरचा हक्कही तिनं त्याच्या प्रेमासाठी टाळला. कदाचित म्हणूनच ती अपर्णा झाली असेल. इतक्या सर्वगुणसंपन्न अशा सतीने त्याच्यावरती बेधुंदपणे आयुष्य ओवाळून दिलं तो शिव खरोखरच किती सत्य आणि सुंदर असणार आहे! शिवाला प्राप्त आणि प्रिय झालेली सती ज्या वेळेला तिच्या माहेरीच्या लोकांकडून अपमानित होते त्यावेळेला आपल्या पतीचा अपमान सहन न होऊन ती स्वत:ला अग्निकुंडात झोकून घेते. आणि मग तिथे सुरू होतं खरं शिवतांडव! आपल्या पत्नीवरचं इतकं उत्कट प्रेम इतर कोणत्याही देवतेच्या बाबतीत इतिहासात किंवा देववाङमयात अन्य कुठेही चित्रित झालेलं नाही.
अगदी उत्कट प्रेमाचा सर्वोच्च आविष्कार म्हणजे सतीच्या मृत्यूनंतर झालेलं शिवाचं रुद्रतांडव. आपल्या प्रियचा विरह सहनच न झालेला तो, आता तिच्या शवासोबत बसून राहतो. त्यानंतर तिचा देह हातांवर उचलून सतत आक्रोश करत तो त्रिभुवनातून भ्रमण करत राहतो. भगवान विष्णूंना त्याची ही अवस्था सहन न झाल्यामुळे त्याला या मोहातून मुक्त करण्यासाठी त्यांनी आपलं सुदर्शन चक्र सतीच्या मृतदेहावर सोडलं. आणि त्याबरोबर क्रमश: एकावन्न ठिकाणी सतीच्या देहाचे अवयव गळून पडले आज ती सर्व शक्तिपीठे म्हणून ओळखली जातात. सती अशा तऱ्हेने ज्यावेळेला आदितत्त्वात विलीन झाली, तेव्हाही शंकर इतकी शोकमग्न होते, की पुनश्च एकदा सर्व आधिभौतिक गोष्टी बाजूला सारून ते तपाला बसले. आणि हे तप इतकं अचल होतं की त्या तपातून त्यांना बाहेर काढण्यासाठी नेमल्या गेलेल्या रती आणि मदनाच्या जोडीतील मदनाचाही त्यांनी तृतीय नेत्र उघडून संहार करून टाकला. समाधीतून बाहेर आलेल्या शंकरांचा आणि पार्वती म्हणून पुन्हा जन्माला आलेल्या सतीचा एकत्र येण्याचा योग आला. आणि शंकरांना जाणवलं हे प्रेमी जीवांना विलग करणे ही किती भयंकर गोष्ट आहे! त्यामुळे मदनाला त्याने उ:शाप दिला, की तो अनंग असेल. आणि रतीचा विरह नाहिसा केला. भगवान विष्णूंच्या इतर अवतारासारख्या शंकरांवर भाळणाऱ्या अन्य स्त्रियांची उदाहरणं इतिहासात नाहीत. मूलत: इतक्या उग्रमंगलावर भाळणे हे सर्वसामान्य स्त्राrचं कामच नव्हे. हा आदिनाथ ओंजळीत घेऊन सांभाळायला आदिमाया पार्वतीच एकमेव योग्य स्त्राr ठरली!
विचार केला तर खरंच हा वेडा भाबडा देव! हा आद्य कलाकार, कलानिधी. स्वर यानंच निर्माण केले. संगीताची निर्मिती याची. निद्रिस्त पार्वतीला पाहून तानपुऱ्याची कल्पना सुचली ती यालाच! क्रमश: प्रगत होत जाणाऱ्या विश्वाची चित्रं सरगमच्या आधारे निर्माण केली ती याच देवतेने. म्हणूनच सांगितलं असणाऱ्या रावणासारख्या राक्षसाला सुद्धा आत्मलिंग देण्याचे वचन देऊन मोकळा झाला. कारण एकच! कलाकारांचा लहरीपणा. शिवाला खुश करण्यासाठी काय करावे लागते हे अचूक माहीत असलेल्या रावणानं शिवमहिम्नस्तोत्र रचलं. सुरेल आवाजात गायन करून शंकराला अक्षरश: संमोहित केलं. पुराण कथांमध्ये अजून एक उदाहरण आढळतं. ते म्हणजे शंकर आणि जालंधर दैत्य यांच्या युद्धामध्ये शंकर कसेच पराभूत होईना. त्या वेळेला जालंधराने आपल्या मायेने शंकरांच्या सभोवती सुस्वर वाद्य वाजवणारे अनेक पुरुष निर्माण केले. आणि शंकर त्यात इतके गुंग झाले की ते युद्ध करायचं विसरले.
दशावतारी नाटकांमधून आणि जय जय गौरीशंकर यासारख्या संगीत नाटकातही दाखवलेली गोष्ट म्हणजे ईश्वर पार्वतीचं सारीपाट खेळणे.. पूर्ण जगाचा कारभार सांभाळता सांभाळता शंकर आपल्या पत्नीसोबत जगाचा भलं चाललं आहे किंवा नाही हे पाहण्याकरता आकाश मार्गे फेऱ्या मारत असतात हे कित्येक कथा कहाण्यांमधून येतं. पण इतक्या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून ती पती-पत्नी सारीपाटासारखा मोठा मौजेचा खेळ खेळतात. त्याच्यामध्ये त्यांची भांडणं होतात. मग पार्वती रागावून रुसून निघून जाते. आणि शंकरांना तिला शोधत यावं लागतं. उभयतांमध्ये समेट होतो. त्यांच्यामधल्या प्रेमाचे हेही ताणेबाणे किती मोहक वाटतात! कार्तिकीय आणि गजानन या सर्वस्वी वेगळ्या स्वभावाच्या अपत्यांचे हे माता पिता. कार्तिकेय ही अविवाहित देवता.
कार्तिकेयाचा बाहुबलावर विश्वास. आणि गणेश हे बुद्धिबलवंत. अशा दोन मुलांसोबत राहणारे शंकर हे पिता म्हणून किती महान आहेत याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत राहतो. ही देवता, देवांचे देव महादेव हे कमी तिथे आम्ही या तत्त्वाचे पालन करतात. समुद्रमंथनाचे फायदे घ्यायला सगळे देव पुढे असतात. पण हलाहल पचवायची वेळ येते त्या वेळेला शंकरांना पाचारण करावं लागतं. आणि जगाच्या कल्याणासाठी ते साक्षात कालकूट ते जराही विलंब न करता कंठी धारण करतात. त्यांना महादेव म्हणतात ते उगीच नाही. कडू गोष्टींचं विष कंठातच धरून ठेवायला हिम्मत हवी तरी केवढी? म्हणूनच ज्यात शिव नाही ते शव होऊन राहतं. आणि प्रत्येक सज्जनाची अंतिम प्रार्थना हीच असते.
शिव के मन शरण हो
जब प्राण तन से निकले
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु