भगवंत आत्मविचाराची गोष्ट अर्जुनाला सांगत आहेत
अध्याय चौथा
कौरव आपले भाऊबंद असल्याने त्यांना युद्धात मारणे उचित नाही आणि त्यांना मारण्याचे पाप आपल्या माथी विनाकारण बसेल अशी भीती अर्जुनाला वाटत होती. म्हणून तो युद्धातून पळ काढू पाहात होता. भगवंतांना त्याचे असे कर्तव्य टाळून पळून जाणे मुळीच आवडले नाही. ह्यावरून लक्षात येते की, जी माणसे आळसाने, भीतीने किंवा मोहापोटी कर्तव्य करण्याचे टाळतात ती माणसे भगवंतांना मुळीच आवडत नाहीत. अर्जुन त्यांचा लाडका भक्त असल्याने त्यांनी त्याला कर्तव्य टाळण्यापासून रोखायचे ठरवले. त्यांनी त्यासाठी त्याला केलेल्या उपदेशाचा आपण अभ्यास करत आहोत. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी त्याला ज्ञानयोग किंवा सांख्ययोग समजावून सांगितला. त्यानुसार आपण आत्मस्वरुप असून आपला आत्मा अमर आहे. तो प्रत्येक जन्मात वेगळे देह धारण करतो त्यामुळे माणसाचा देह गेला तरी आत्मा जसाच्या तसा राहतो. म्हणून कुणाच्या मृत्यूचा शोक करणे योग्य नाही, असे सांगितले.
कर्मयोग ह्या तिसऱ्या अध्यायात भगवंतांनी निरपेक्षतेने कर्म करण्याचे महत्त्व पटवून दिले. जो निरपेक्षतेने कर्मे करतो त्याला इंद्रियांवर विजय मिळून तो मोक्षाचा धनी होतो असे सांगितले. येथून पुढे चौथा अध्याय आपण अभ्यासणार असून ह्या अध्यायाचे नाव ‘ज्ञानकर्मसंन्यास’ योग असे आहे. ह्यामध्ये ज्ञान म्हणजे काय हे ज्यांनी समजून घेतले आहे त्यांना कर्म कशाला म्हणायचे, अकर्म कशाला म्हण विकर्म कोणते ते समजावून सांगितले आहे तसेच संन्यास म्हणजे कर्म टाळणे नसून कर्माच्या फलाचा त्याग करणे हे सांगितले.
थोडक्यात आधी सांगितलेल्या ज्ञान, कर्म आणि संन्यास ह्यांची एकमेकांशी सांगड कशी घालायची ह्याचा उपदेश ह्या अध्यायात त्यांनी अर्जुनाला केलेला आहे. आपणही तो सविस्तर समजावून घेऊ आणि तो आपल्या जीवनात उतरवण्याच्या प्रयत्न करूयात.
अध्यायाच्या विवरणाला आरंभ करताना माउली म्हणतात, आज आपल्या कानांचे भाग्य उजाडले आहे कारण स्वप्नवत वाटणारे गीतेचे श्रवण यथार्थ म्हणजे जसे व्हायला पाहिजे तसे होत आहे. आधीच ही आत्मविचाराची गोष्ट आहे. आत्मविचाराची गोष्ट म्हणजे आत्म्यासबंधी विचार ज्यात होतो ती गोष्ट. सर्वजण नेहमी देहाचा विचार करत असतात. त्याचे भले कसे होईल हे पहात असतात. कारण देह सुखी तर आपण सुखी असा सर्वसाधारण समज असतो परंतु भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे देह काय, आज आहे तर उद्या नाही पण आत्म्याचे तसे नाही. तो कायम असतो म्हणून त्याच्यासंबंधी विचार करून त्याचे भले कसे होईल ह्याचा विचार करण्यास प्राधान्य दिले पाहिजे असे भगवंत गीतेत सांगतात. आत्मा हा आपल्या देहात अडकलेला असतो. त्याला तेथून कसे सोडवता येईल हे सांगण्यावर भगवंतांनी गीतेत भर दिला आहे. म्हणून माउली म्हणतात, अशी आत्मविचाराची गोष्ट भगवान श्रीकृष्ण स्वत: सांगत आहेत आणि ऐकायला भक्त शिरोमणी अर्जुनासारखा श्रोता म्हणजे एक उत्तम पर्वणीच. कोकिळेसारखा पंचम स्वर, त्यातच उत्तम सुवास व गोडी हे तिन्ही एकत्र आले की, जसा आनंद होतो तसाच प्रकार या गीतारूपी कथामृताचा आहे. त्यामुळे यात सर्व इंद्रियांना आनंद होईल अशी गोडी आहे. श्रोत्यांच्या दैवाची थोरवी काय वर्णावी? श्रोत्यांची जपतपे फळास येऊन अमृतरूपी गंगाच त्यांना प्राप्त झाली आहे. म्हणून आता सर्व इंद्रियांनी आपापली कामे सोडून श्रवणाचे ठिकाणी जाऊन रहावे आणि कृष्णार्जुन संवादरूपी गीतेचे सुख घ्यावे.
क्रमश: