For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भगवंत अर्जुनाला कर्मयोगाचा इतिहास सांगत आहेत

06:52 AM Jan 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
भगवंत अर्जुनाला कर्मयोगाचा इतिहास सांगत आहेत
Advertisement

अध्याय चौथा

Advertisement

माउली म्हणाले, आज आपल्या कानांचे भाग्य उजाडले आहे. कारण स्वप्नवत वाटणारे गीतेचे श्रवण यथार्थ म्हणजे जसे व्हायला पाहिजे तसे होत आहे. आधीच ही आत्मविचाराची गोष्ट आहे. ती भगवान श्रीकृष्ण स्वत: सांगत आहेत आणि ऐकायला भक्त शिरोमणी अर्जुनासारखा श्रोता म्हणजे एक उत्तम पर्वणीच. श्रोत्यांची जपतपे फळास येऊन अमृतरूपी गंगाच त्यांना प्राप्त झाली आहे. म्हणून आता सर्व इंद्रियांनी आपापली कामे सोडून श्रवणाचे ठिकाणी जाऊन रहावे आणि कृष्णार्जुन संवादरूपी गीतेचे सुख घ्यावे. जे गुह्य श्रीकृष्णांनी आपला पिता वसुदेव, माता देवकी व बंधु बलराम ह्यांनाही सांगितले नाही, ते दैवी संपत्तीने युक्त असलेल्या अर्जुनास अतिप्रेमाने सांगितले. लक्ष्मीदेवी भगवंतांच्या नेहमी सान्निध राहणारी पण तिलाही त्या प्रेमसुखाचा अनुभव लाभला नाही, सनकादिक त्याची खूप दिवसापासून इच्छा करत होते पण त्यांनाही एव्हढ्या उच्च प्रतिचे प्रेम प्राप्त झाले नाही. परंतु अर्जुनाला मात्र तो प्रेम ठेवा मिळाला आहे. या जगदीश्वराचे अर्जुनावर अगदी निरुपम प्रेम होते. अर्जुनाने हे सर्वोत्तम पुण्य कसे प्राप्त केले असेल ? अर्जुनाच्या प्रेमामुळे श्रीकृष्ण हा निराकार असूनही साकार झाला. अर्जुनाची त्या देवाशी झालेली एकरूपता मला आवडली आहे. एरव्ही हा श्रीकृष्ण परमात्मा योग्यांनाही सापडत नाही, वेदांना याचे वर्णन करता आले नाही, ध्यानानेही याला जाणता येत नाही, तो हा आत्मस्वरूप, उत्पत्तीरहित श्रीकृष्ण, त्रैलोक्यरूपी वस्त्राची घडी आहे. हा सर्व प्रकारच्या आकाराच्या पलीकडचा आहे पण अर्जुनाने नि:स्वार्थ प्रेमाने अनंताला आपलेसे केले आहे. देव भावाचा भुकेला असून त्याला आपल्याकडून प्रेमाशिवाय काहीच नको असते.

अध्यायाला सुरवात करताना भगवंत अर्जुनाला कर्मयोगाचा इतिहास सांगत आहेत. अध्यायाच्या पहिल्या श्लोकात ते म्हणाले, मागील अध्यायात तुला सांगितलेला कर्मयोग हा जुनाच आहे. कदाचित तुला असे वाटेल की, तू युद्धाला तयार व्हावेस म्हणून मी हा मुद्दाम तयार करून तुला सांगत आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. ह्या अविनाशी कर्मयोगाची परंपरा तुला थोडक्यात सांगतो. हा कर्मयोग सृष्टीच्या आरंभी मी सूर्याला सांगितला, सूर्याने तो मनूला सांगितला आणि मनूने आपला पुत्र राजा इक्ष्वाकूला सांगितला.

Advertisement

योग हा अविनाशी मी स्वंये सूर्यास बोलिलो । मनूस बोलिला सूर्य तो इक्ष्वाकूस त्यापरी ।। 1 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की, अर्जुना! हाच योग पूर्वी मी सूर्याला सांगितला. अर्थात त्याला आता खूप काळ लोटला. मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती उत्तम प्रकारे मनूला सांगितली. मनूने स्वत: त्या योगाचे आचरण केले आणि मग आपला पुत्र इक्ष्वाकूला त्याचा उपदेश केला. कर्मयोग परंपरेने पुढे कसा चालत आला हे पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. ते म्हणाले, परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षीनी जाणला परंतु हे अर्जुना पुढे काळ जसजसा पुढे सरकला तसतसे कर्मयोगाचे महात्म्य कमी होऊन तो पुढे लुप्त झाला.

अशा परंपरेतूनि हा राजर्षीस लाभला । पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला ।।2 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतानी अर्जुनाला असे सांगितले की, इक्ष्वाकूनंतर ह्या निष्काम कर्मयोगाला जाणणारे आणखी कांही राजर्षी होऊन गेले पण पुढे हळूहळू हा लोप पावला. कारण प्राणिमात्रांचा सगळा भर ‘काम’ या विषयावर होता आणि ते देहालाच सत्य मानत होते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.