भगवंत अर्जुनाला योगशास्त्राची माहिती देणार
अध्याय सहावा
माउली म्हणतात, पाचव्या अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला म्हणाले, मी विश्वचालक असून, यज्ञ आणि तप करणाऱ्यांचा भोक्ता आहे. मी लोकांचे भले चिंतणारा असून, त्यांचे भले व्हावे म्हणून सदैव प्रयत्न करत असतो. म्हणून मी त्यांचा सोयरा आहे. जो मला सोयरा मानतो, त्याला मी त्याच्या पाठीशी आहे अशी खात्री असल्याने तो निर्धास्त असतो. त्यामुळे त्याचे मन कायम शांत असते. ह्याउलट ज्याचा स्वत:च्या कर्तृत्वावर जास्त विश्वास असतो तो मात्र आपल्या मनासारखे घडेल की, नाही ह्या विचाराने काळजीत असतो.
श्रीकृष्णांनी योगमार्गावरील त्यांचे मनोगत संन्यासयोग नावाच्या पाचव्या अध्यायाच्या शेवटी थोडक्यात सांगितले. अर्जुन ता म्हणजे ताकभात ओळखण्याएव्हढा चतुर असल्याने, भगवंतांच्या मनोगतातील मर्म त्याने अचूक ओळखले आणि तो आश्चर्यचकित झाला. त्याला त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. भगवंताना अधिक खोदून विचारले तर ते आपल्याला योगमार्ग अगदी व्यवस्थित समजावून देतील हे त्याच्या लक्षात आले. योगमार्गाबद्दल अधिक जाणून घ्यायची निर्माण झालेली जिज्ञासा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्यावरून श्रीकृष्णांना अर्जुनाची इच्छा जाणली. त्यांनी हसून अर्जुनाला विचारले, ‘आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का? भगवंत आपले मनोगत ओळखतात हे माहित असल्याने अर्जुन त्यांना म्हणाला श्रीकृष्णा, आपण तर मनकवड्यांचे राजे आहात. आपण माझ्या मनातला विचार लगेच ओळखलात. मला जे काही तुम्हास विचारावेसे वाटते, ते देवा आपण आधीच जाणलेत. तरी आपण जे बोललात तेच स्पष्ट करून सांगा. सहज विचार करून पाहिले तर देवा, तुम्ही जो योगमार्ग दाखवला, तो सांख्यमार्गाहून सोपा आहे. परंतु आमच्यासारख्या दुर्बळांना तो साध्य करण्यास विलंब लागेल, म्हणून देवा, योगमार्गाचे आरंभापासून अखेरपर्यंत वर्णन करा. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुला हा मार्ग जाणून घ्यायचा असेल तर मी तो आनंदाने सांगिन. अर्जुना तू माझे ऐकतोस व त्याप्रमाणे आचरण करतोस हे मला फार आवडते. लेकराच्या आवडीचा विषय पुढे आल्यावर आईची ममता अद्भुत रूप धारण करते. भगवंतांचे अंत:करण आईच्या अंत:करणासारखेच असल्याने त्यांच्या मनात अर्जुनाविष्यी कळवळा दाटून आला.
माउली पुढे म्हणतात, हरीची कृपादृष्टि करुणरसाच्या वर्षावासारखीच असते. अर्जुनाची विनंती ऐकून भगवंताना अतिशय आनंद झाला. त्यांनी अर्जुनाकडे प्रेमभऱ्या नजरेने पाहिले. हरीची अमृताचा वर्षाव करणारी दृष्टी अर्जुनाच्या प्रेमाने मस्त झाली होती. अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या हरीला अर्जुन सोडून इतर काही दिसतच नव्हते. हरीच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही आणि यात आश्चर्य ते कसले? कारण जो आपले मोजमाप आपणच जाणत नाही त्याचे आकलन इतर कुणाला कसे होईल? देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले असल्याने ते त्याची मनधरणी करत होते. आईच्या मायेने अरे बाबा, माझे ऐक, असे म्हणत होते. अर्जुनाच्या कलाकलाने घेत, त्याच्या चित्ताला कळेल अशा रीतीने, थोड्याफार कौतुकाने त्याची समजूत घालत होते.