श्री दत्तप्रभू आणि वाघ
वाघाचे उल्लेख आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतात. शुक्लयजुर्वेद, अथर्ववेद, ऐतरीय ब्राह्मण ग्रंथ यात वाघाचे उल्लेख असून, हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या उत्खनित वस्तूंवर वाघांची चित्रे आहेत. वाघ आणि अध्यात्म यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. श्री दत्तप्रभू आणि वाघ यांच्या कथा आणि उल्लेख वारंवार श्रीदत्तअवतारात येतात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामध्ये तेराव्या अध्यायात वाघांना अभयदान दिल्याची कथा आहे.
जंगल सफारी सध्या अतिशय लोकप्रिय आहे. त्यातील मुख्य आकर्षण म्हणजे वाघ. वाघ बघायला मिळाला की सहलीचे सार्थक होते. वाघ बघण्यासाठी सारेजण आसुसलेले असतात. पिंजऱ्यात बद्ध असणारा वाघ देखील दुरून अंतर राखून बघणारा समाज, वाघाच्या जवळ जायला का बरे बघतोय? वाघ हा हिंस्र, क्रूर प्राणी आहे. प्राचीन काळी वाघाची शिकार करून त्याचे कातडे दिवाणखान्यात मिरवणे ही राजारजवाडे यांच्यासाठी प्रतिष्ठा होती. सामान्य माणूस मात्र दंतकथा आणि कानगोष्टी यातच रमत होता. वाघाचा घास म्हणजे माणसाचा मृत्यू. हे समीकरण मनात ठसवणाऱ्या घटना आजही सभोवती घडतात. तरीही वाघ जवळून बघायला मिळावा ही ओढ माणसांना आहेच.
वाघाचे उल्लेख आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतात. शुक्लयजुर्वेद, अथर्ववेद, ऐतरीय ब्राह्मण ग्रंथ यात वाघाचे उल्लेख असून, हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या उत्खनित वस्तूंवर वाघांची चित्रे आहेत. वाघ आणि अध्यात्म यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. वाघ हा अंबेचे वाहन आहे. श्रीदत्तप्रभू व्याघ्रांबरधारी आहेत. शिव व्याघ्रचर्म धारण करतात. राज्याभिषेक हा सुद्धा व्याघ्रचर्मावर करीत असत. राजा हा वाघाप्रमाणे बलवान असावा हा हेतू असावा. वाघासंबंधी कुळाचार काही कुटुंबात आहेत, तर काही लोक हे वाघ भक्त देखील असतात. आदिवासी संस्कृतीमध्ये वाघाला देवाचे स्थान आहे. गावाच्या वेशीजवळ वाघदेव असतो. वाघनखे हा एक अलंकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांजवळ कवड्याच्या पोतीमध्ये गठवलेली, पाचू जडवलेली वाघनखांची माळ होती. तसेच महाराजांनी अफजलखानला मारण्यासाठी वाघनखांचा शस्त्र म्हणून वापर केला असेही इतिहास सांगतो.
श्री दत्तप्रभू आणि वाघ यांच्या कथा आणि उल्लेख वारंवार श्रीदत्तअवतारात येतात. श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामध्ये तेराव्या अध्यायात वाघांना अभयदान दिल्याची कथा आहे. श्रीपादश्रीवल्लभांचा नरसय्या नावाचा एक शिष्य रायचूरहून कुरवपूरला श्रीपादांच्या दर्शनासाठी आला होता. बघतो तर काय श्रीपाद स्वामी ध्यानमग्न असून त्यांच्यासमोर दोन मोठे वाघ बसलेले आहेत. नरसय्या खूप घाबरला हे बघून श्रीपादांनी वाघाला तिथून निघून जाण्याची आज्ञा केली. तरी तो भीतीने थरथरत होता. तेव्हा अभय देऊन श्रीपादांनी त्याला त्याच्या येण्याचे कारण विचारले तेव्हा तो संतानप्राप्तीसाठी आल्याचे कळले. त्यावर श्रीपादानी लोटा भरून कृष्णा नदीचे पाणी त्याला आणायला सांगितले व आशीर्वाद दिला आणि ते पाणी पत्नीला प्राशन करायला दे असे सांगितले. एका वर्षानंतर ते दांपत्य आपल्या जुळ्या मुलांना घेऊन श्रीपादांच्या दर्शनाला कुरवपूर येथे आले तेव्हा श्रीपादस्वामी त्या बाळांना मोठा अन् छोटा पुलीराज (वाघ) असे म्हणाले. हे ऐकून नरसय्या पुन्हा घाबरला तेव्हा श्रीपादश्रीवल्लभ म्हणाले, ‘अरे तू मागच्या वर्षी दर्शनाला आला होतास तेव्हा इथे दोन वाघांना पाहिले होतेस ना? ते वाघ जन्मापासून मुक्तीची याचना करत होते. त्यांना मी तुझ्या पोटी जन्म घेण्याची आज्ञा आणि आशीर्वाद दिला होता. तू भिऊ नकोस. त्या दोघांनी त्यांचा हिंस्र स्वभाव माझ्या दर्शनानंतर सोडला आहे. ही उत्तमातील उत्तम मुले होतील. त्यांची नावे तू नृसिंह व नरसिंह अशी ठेव.’ हे ऐकून त्या दांपत्याला खूप आनंद झाला. महात्मा व्याघ्रेश्वर यांचीही कथा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात आहे. व्याघ्रेश्वराने बद्रिकेदार येथे उग्र तपश्चर्या करून व्याघ्ररुप धारण केले तेव्हा त्याचे रूपांतर एका वाघात झाले. त्याला जेव्हा ‘श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये’ हा मंत्र म्हणत कुरवपुरी जाण्याची आज्ञा झाली तेव्हा तो कुरवपूरला आला. त्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या परमभक्ताला भेटण्यासाठी नदीच्या पैलतीरी पाण्यावरून चालत गेले आणि वाघावर बसूनच गावात आले. आपले कातडे जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभांना वाघाने अर्पण केले तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले, तू पूर्वजन्मी मल्ल होतास. अनेक वाघांचा तेव्हा खूप छळ केलास. हे दुष्कर्म तुला नीच योनीत घेऊन गेले असते परंतु माझ्या अनुग्रहाने ते हरण झाले. तू आता प्रज्ञावंत होशील आणि मनात येईल तेव्हा व्याघ्ररूप धारण करून ते सोडशील देखील.
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात शंकर भट्टांना एका गुहेत एका ज्ञानी महात्म्यांनी वाघ स्वरूपात दर्शन देऊन ओंकाराचा उच्चार केला अशी कथा आहे. अरण्यऋषी म्हणून प्रख्यात असलेले मारुती चितमपल्ली यांनी एक निरीक्षण नोंदवले आहे. ब्राह्ममुहूर्तावर वाघ हा दऱ्याखोऱ्यांमधून ओंकाराची साधना करतो. या स्वराचा उगम वाघापासून झाला असावा. हा स्वर वाघाच्या नाभीतून कंठात येतो आणि कंठातून अंतरिक्षात विलीन होतो. वाघाच्या या स्वराची प्राणिमात्रांना अजिबात भीती वाटत नाही.
माहूरगडावर श्रीदत्तप्रभूंनी श्रीचक्रधर स्वामींना व्याघ्ररूपात दर्शन दिल्याची कथा आहे. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या चरित्रात देखील वाघांबद्दल उल्लेख सापडतात. संन्यासधर्म स्वीकारण्यापूर्वी वासुदेवशास्त्राr म्हणून ख्यात असलेले स्वामी रात्री अपरात्री एकटे रानावनातून जात असत. एकदा परगावी जात असताना रात्री रस्त्यात एक मोठा वाघ त्यांच्या दृष्टीस पडला. हे बघून स्वामी एका झाडावर चढून बसले. वाघ काही रस्ता सोडून जाईना. नंतर श्रीदत्तप्रभूंनी स्वामींना सांगितले की तुम्ही रात्री अपरात्री रानातून हिंडता म्हणून आपणच वाघाचे रूप घेऊन तुम्हाला भीती दाखवली. स्वामी जेव्हा बद्रीनारायणाच्या यात्रेला गेले होते तेव्हा प्रवासात एक मोठा वाघ स्वामी महाराजांसमोर येऊन उभा राहिला. त्याने स्वामी महाराजांच्या खांद्यावर दोन पाय ठेवून गर्जना केली. ती भयंकर डरकाळी ऐकून स्वामी त्या वाघाला म्हणाले, ‘तू नरसिंह परमेश्वर आहेस. तुला काय करायचे ते आनंदाने कर’. महाराजांचे हे उद्गार ऐकताच वाघाने खांद्यावरील पाय खाली घेतले आणि तो निघून गेला. स्वामी महाराजांच्या अंत:करणाची परीक्षा घेण्यासाठी प्रत्यक्ष दत्तप्रभूच वाघाचे रूप घेऊन आले.
श्रीअक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे लाडके शिष्य परमपूजनीय बिडकर महाराजांच्या चरित्रामध्ये श्री स्वामी समर्थांनी त्यांना वाघरूपात दर्शन दिल्याची कथा आहे. पू. बिडकर महाराज हे समर्थ आज्ञेने नर्मदा परिक्रमा करीत असताना एकदा वाट चुकून घनदाट जंगलात शिरले. चालताना जिथे वाट संपते तेथे येऊन ते थांबले. प्रचंड मोठा समोर उभा असलेला तुटलेला कडा आणि खाली अतिशय वेगवान खळाळता नर्मदा मातेचा प्रवाह. रात्र झाली होती. त्या भयंकर अरण्यात एका खडकावर बसून ते नामस्मरण करीत होते. तेवढ्यात एक आक्राळ विक्राळ रूपात भयंकर वाघ डरकाळ्या फोडत त्यांच्या समोर येऊन उभा ठाकला. ही आपल्या सद्गुरू स्वामी समर्थांचीच लिला आहे हे जाणून त्यांनी वाघाला साष्टांग नमस्कार घातला. ते स्वामींना म्हणाले, ‘या घनदाट अरण्यात माझे रक्षण करण्यासाठी वाघरूप घेऊन तुम्हीच आलात ना? तुमच्यावाचून कोण येणार? तेव्हा स्वामी समर्थ महाराज व्याघ्ररूप सोडून मूळ रूपात प्रकट झाले आणि आनंदाने त्यांनी आपल्या शिष्याला जवळ घेतले.
वाघ हा प्राणी एकांतप्रिय आहे. स्वावलंबी झाला की जन्मस्थानाचा त्याग करून तो पुन्हा तिकडे कधीही फिरकत नाही. वाघ हा अलिप्तपणे जीवन जगतो. श्रीदत्तप्रभू क्षणाक्षणात, कणाकणात विरघळलेले आहेत. व्याघ्ररुप म्हणूनच ते धारण करीत असावेत.
- स्नेहा शिनखेडे