इस्रायलकडून लोरा क्षेपणास्त्राची होणार खरेदी
क्षेपणास्त्राचा सुपरसोनिक वेग : 400 किमीचा मारक पल्ला
वृत्तसंस्था/ तेल अवीव
अचूक हवाई हल्ला करणारी क्षेपणास्त्रs निर्माण करण्यात इस्रायलचा हात कुणीच धरू शकत नाही. आता भारतीय वायुदलाने इस्रायलकडून एएलसीएमहून अधिक विध्वंसक क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय वायुदल आता एअर लोरा क्षेपणास्त्राच्या अधिग्रहणाचे मूल्यांकन करत आहे. या क्षेपणास्त्राला इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजनने विकसित केले असून हे एक लाँग-रेंज आर्टिलरी क्षेपणास्त्र असून ते अचूक स्ट्राइक सामरिक क्षेपणास्त्राचे एक डीप स्टँड-ऑफ व्हेरिएंट आहे. भारत स्वत:च्या अचूक हल्ला करण्याच्या क्षमतेत भर घालणार आहे.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकिस्तानच्या 11 वायुतळांवर अचूक हल्ले केले होते. यादरम्यान भारताने वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांचा वापर केला होता, ज्यात ब्राह्मोससह इस्रायली एएलसीएम क्षेपणास्त्राचाही समावेश होता. 250 किलोमीटरचा मारक पल्ला असलेल्या रॅम्पेज एएलसीएमला भारतीय वायुदलाने स्वत:च्या एसयू-30एमकेआय, मिग-29 आणि जग्वारच्या ताफ्यासोबत इंटीग्रेट केले आहे.
रॅम्पेज एएलसीएम क्षेपणास्त्र डागण्यासाठी शत्रूच्या नजीक जावे लागते, यामुळे शत्रूच्या हवाई सुरक्षा प्रणालीकडून लढाऊ विमान लक्ष्य केले जाऊ शकते. पाकिस्तानला चीन नवी अत्याधुनिक हवाई सुरक्षा प्रणाली पुरविणार आहे. याचमुळे भारतीय वायुदल दीर्घ पल्ल्यापर्यंत मारा करणाऱ्या लोरा क्षेपणास्त्राची निवड करत आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारतीय लढाऊ विमान 400 किलोमीटरच्या अंतरावरूनच शत्रूच्या कुठल्याही वायुतळावर हल्ला करू शकते.
एअर लोरा किती विध्वंसक?
एअर लोरा हे एक अत्याधुनिक आकाशातून डागता येणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (एएलबीएम) असून याचा मारक पल्ला 400 किलोमीटर आहे. या क्षेपणास्त्राचे वजन जवळपास 1600 किलोमीटर असून ते सुपरसोनिक वेगाने प्रहार करते. यात अत्याधुनिक आयएनएस/जीपीएस नेव्हिगेशन सिस्टीम, जीएनएसएस अँटी-जामिंग तंत्रज्ञान आणि ‘फायर अँड फॉरगेट’ क्षमता आहे. तसेच याचे सर्वात मोठे वैशिष्ट्या डीप-पेनेट्रेशन वॉरहेट्स असणे आहे. एक एसयू-30 एमकेआय लढाऊ विमान 4 एअर लोरा क्षेपणास्त्रांना वाहून नेऊ शकते.
इस्रायलसोबत महत्त्वपूर्ण करार
भारताने एअरो इंडिया 2023 मध्ये एअर लोराची भारतात निर्मिती करण्यावरून इस्रायलसोबत करार केला होता. याच्या अंतर्गत एअर लोरा क्षेपणास्त्राला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इस्रायलच्या कंपनीच्या भागीदारीत निर्माण केले जाणार आहे. भारतीय नौदलाने यापूर्वीच जमीन अन् समुद्रातून डागता येणाऱ्या लोरा व्हर्जनला सामील केले आहे. आता एअर लोरा क्षेपणास्त्र वायुदलात सामील झाल्याने सैन्यक्षमता वाढणार आहे.