अफगाण खजिन्याची लूट चीनला महागात
तखारमध्ये चिनी नागरिकाची हत्या : ड्रॅगनला आता तिहेरी टेन्शन
वृत्तसंस्था/ काबूल
अफगाणिस्तानात सोन्यापासून लिथियमच्या 1 ट्रिलियन डॉलर्सच्या साठ्यावर नजर ठेवून असलेल्या चीनला मोठा झटका बसला आहे. चीनच्या एका नागरिकाची तखार प्रांतात हत्या करण्यात आली आहे. हा चिनी नागरिक अफगाणिस्तानच्या खाणीत कार्यरत होता आणि तो तालकान शहराच्या दिशेने परतत असताना अज्ञात इसमांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. चिनी नागरिकासोबत असलेल्या दुभाषी अन् अन्य एका इसमालाही गोळी लागली आहे. तर तालिबानने जखमी दुभाषीची कसून चौकशी सुरू केली आहे. चीनसाठी पाकिस्तान आणि ताजिकिस्ताननंतर आता अफगाणिस्तानातूनही टेन्शन वाढले आहे.
तालिबानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी तजाकिस्तानमध्ये देखील चिनी नागरिकांवर हल्ला करण्यात आला होता. यात एका चिनी नागरिकाला जीव गमवावा लागला होता. तर 4 चिनी नागरिक जखमी झाले होते. तजाकिस्तानमध्ये चीनचे नागरिक सोन्याच्या खाणीत काम करत होते. या पूर्ण अशांत भागात आता चिनी नागरिक लक्ष्य ठरू लागले आहेत. अफगाणिस्तान, तजाकिस्तान आणि पाकिस्तानात चीनने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली असूनही अशाप्रकारचे हल्ले होत आहेत.
लिथियमवर चीनची नजर
अमेरिकेने अफगाणिस्तानातून काढता पाय घेतल्यावर चीनने तेथील स्वत:ची उपस्थिती वाढविली आहे. चीनने अफगाणिस्तानच्या तालिबानी राजदूताला मान्यता दिली आहे. तसेच चीनने अफगाणिस्तानात तेल उत्खनन सुरू केले आहे. आता चीनची नजर अफगाणिस्तानातील लिथियम, सोने इत्यादी खनिजसाठ्यांवर आहे. चीनने तेथील खाणींमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.