For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तीनशे चाळीस कोटीच्या सोन्याची लूट

06:49 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
तीनशे चाळीस कोटीच्या सोन्याची लूट
Advertisement

ही घटना अमेरिकेतील आहे. अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएचे एक माजी अधिकारी डेव्हिड रश यांनी त्यांच्या कार्यकालात अमेरिकेच्या तिजोरीतून 340 कोटी रुपयांच्या सोन्याची लूट केल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यांच्या घरावर धाड पडली, तेव्हा, त्यांच्या घरातून सोन्याचे 303 बार, 17 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 32 महागडी घड्याळे जप्त करण्यात आली. घड्याळांपैकी अनेक रोलेक्स ब्रँडची होती. पण त्यांना ही लूट करता कशी आली, असा अनेकांना प्रश्न आहे. त्यांच्या तपासणीत असे आढळून आले, की गुप्तचर प्राधिकरणांना गुप्त माहिती मिळविण्यासाठी किंवा त्यांची अभियाने चालविण्यासाठी रोख रक्कम दिली जात असे. तसेच सोने किंवा चांदी अशा मौल्यवान धातूंच्या स्वरुपात व्यवहार केले जात. अमेरिकेचे प्रशासन युद्ध, आर्थिक संकट आणि गुप्त अभियान आदींच्या प्रसंगांमध्ये कित्येकदा मौल्यवान धातूंचा चलन म्हणून उपयोग करते. असे व्यवहार सीआयएचे अधिकारी म्हणून करताना. ते युक्तीने काही वाटा स्वत:साठी राखून ठेवत. हे सर्व व्यवहार गुप्तपणे होत असल्याने त्यांची ही युक्ती कोणाच्याही लक्षात लवकर आली नाही. सीआयएचा वरीष्ठ अधिकारी या नात्याने त्यांच्याकडे सरकारी संपत्तीचा व्यय करण्याचे अधिकार होते. त्यांचा दुरुपयोग करत त्यांनी ही माया जमविली. प्रशासनाच्या गुप्त कागदपत्रांची माहितीही त्यांच्यापाशी या काळात होती.

Advertisement

मुख्य म्हणजे हा भ्रष्टाचार त्यांनी 2025 ते 2026 या अल्प कालावधीत केल्याचे दिसून येत आहे. ही त्यांची सेवेची अखेरची वर्षे होती. या काळात त्यांनी गुप्त अभियानासाठी प्रशासनाकडे अनेकदा सोने, चांदी आणि रोख रकमेची मागणी लेखी स्वरुपात केली होती. त्यामुळे त्यांच्यासंबंधी त्यांच्यापेक्षा वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मनात संशय निर्माण झाला. त्यांनी काहीकाळ रश यांच्यावर पाळत ठेवली. प्रशासनाकडून घेतलेली संपत्ती ते सांगितलेल्या कामासाठीच उपयोगात आणतात की नाही, यावर लक्ष ठेवण्यात आले. संशय बळावल्यानंतर त्यांना सापळा रचून पकडण्यात आले. 18 मे 2026 या दिवशी त्यांच्या व्हर्जिनीया प्रांतातील निवासस्थानावर धाड टाकण्यात आली. या धाडीत त्यांच्याकडे लपविलेली 303 सोन्याची बिस्कीटे जप्त झाली. एका बिस्किटाचे वजन 1 किलो इतके होते. एका सीआयए अधिकाऱ्याने केलेला हा सर्वात मोठा घोटाळा मानण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.