कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लुथरांना लूक आऊट, पासपोर्ट नोटीस जारी

02:47 PM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लुथरा बंधूंच्या वागातोर येथील शॅकचा काही भाग जमिनदोस्त : मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर झोपलेल्या यंत्रणा झाल्या जाग्या

Advertisement

पणजी, म्हापसा : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर क्लबचे मालक गौरव व सौरभ लुथरा बंधू यांच्याच मालकीच्या वागातोर येथील रोमिओ लेन शॅकचा वादग्रस्त भाग जमिनदोस्त करा, असा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्यानंतर काल मंगळवारी सायंकाळी समुद्रकिनारी लागून असलेल्या भागाचे बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले. दुसऱ्या बाजूने लुथरा बंधूंना इंटरपोलद्वारे ‘लूक आऊट नोटीस’ जारी करण्यात आली असून त्याचबरोबर अन्य एका घडामोडीत पासपोर्ट कार्यालयानेही लुथरांचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Advertisement

दरम्यान एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच जर जागे होणार असेल तर ते प्रशासन कसले? 25 जणांचे खून करणाऱ्यांना शिक्षा कधी मिळणार? असे संतप्त सवाल संपूर्ण गोव्यातील जनतेमधून उपस्थित केले जात आहेत. तसेच निलंबित करण्यात आलेल्या पंचायत संचालिका सिद्धी हळर्णकर यांनी बर्च क्लबबाबत जी टाळाटाळ चालविली होती, त्यामागील खऱ्या सूत्रधाराचाही पर्दाफाश तपास यंत्रणांनी करावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. हडफडे येथील बर्च क्लबमध्ये झालेल्या आग दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांच्या मालकीच्या ‘रोमिओ लेन’ क्लबचे बांधकाम त्वरित पाडण्याचा आदेश दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा आणि संबंधित पथकांनी काल ही कारवाई केली. सुरुवातीस समुद्रकिनाऱ्यावरील बांधकाम मोडल्यानंतर उर्वरित बांधकामही मोडून टाकण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.

पासपोर्ट कार्यालयाची कारणे दाखवा नोटीस

पासपोर्ट कार्यालयाने गौरव व सौरभ लुथरा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांचे पासपोर्ट का जप्त करु नये, असे विचारले आहे. नोटिशीस प्रतिसाद देण्यासाठी 7 दिवसांची मुदत त्यांना देण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी पासपोर्ट कार्यालयाला याबाबत विनंती केल्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने ही कारवाई केली आहे.

21 मृतदेह पाठवले गावी

मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार हडफडे दुर्घटनेतील 21 जणांचे मृतदेह सरकारने त्यांच्या गावी रवाना केले आहेत. मृतांमध्ये नाईट क्लबच्या उत्तराखंड, झारखंड, आसाम, पश्चिम बंगालमधील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तसेच दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक येथील पर्यटकांचाही समावेश होता. या सर्वांच्या नातलगांशी संपर्क साधून सरकारने मृतदेह त्यांच्या गावी रवाना करण्याची व्यवस्था केली आहे.

इतरांना पकडण्यासाठीदेशभरात पथके

क्लबच्या व्यवस्थापकासह पाच कर्मचाऱ्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून पुढील तपास वेगाने सुऊ आहे. इतर भागीधारांना अटक करण्यासाठी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यासाठी देशातील दिल्ली व इतर राज्यांत पथके पाठविण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांनी दिली.

निलंबितांकडून चौकशीस सहकार्य 

सरकारने सेवेतून निलंबित केलेल्या सिद्धी हळर्णकर, शर्मिला मोंतेरो, रघुवीर बागकर या अधिकाऱ्यांपैकी हळर्णकर व मोंतेरो या दोघांनी तपासात सहकार्य केले असून पंचायत सचिव रघुवी बागकर याची अद्यापही चौकशी करण्यात आली नसल्याची माहिती शर्मा यांनी दिली. दरम्यान याप्रकरणी हडफडे सरपंच व आजी माजी पंच सदस्य सचिवांची चौकशी होणार असून त्यांनी चौकशीला सामोरे जावे, असेही त्यांनी सांगितले.

पर्यटन अस्थापनांवर नजर ठेवण्यासाठी समिती

पर्यटनाशी संबंधित विविध अस्थापनांवर नजर व देखरेख करण्यासाठी आणि कायदेशीर अंमलबजावणी व्हावी म्हणून गृह खात्याने समिती स्थापन केली आहे. खात्याचे अवर सचिव मंथन नाईक यांनी तसा आदेश जारी केला आहे. समितीचे अध्यक्ष म्हणून गोवा नागरी सेवेतील वरीष्ठ अधिकारी असून पोलीस निरीक्षक, अग्निशामक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते, कार्यकारी अभियंता, वीज खाते कार्यकारी अभियंता असे त्या समितीचे सदस्य आहेत. समितीने प्रति महिना अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करावा असे आदेशातून बजावले आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 85 लाखांची भरपाई मंजूर

हडफडे येथील नाईट क्लबच्या आगीत बळी पडलेल्या मृतांच्या कायदेशीर नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून एकूण रु. 85 लाख गोवा सरकारने मंजूर केले आहेत. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकीत यादव यांनी तसा आदेश जारी केला आहे. वित्त खात्याच्या अनुमतीने सदर आदेश काढण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘बर्च क्लब’चे मालक गौरव - सौरभ लुथरा बंधूंना इंटरपोलची ‘ब्लू कॉर्नर नोटीस’ जारी

हडफडे येथील बर्च क्लबमध्ये शनिवार 6 डिसेंबर रोजी रात्री साडे अकराच्या दरम्यान अग्नितांडव झाले. त्यात 25 जणांचा मृत्यू झाला. एका बाजूने हाहाकार माजला होता तर दुसऱ्या बाजूने क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा हे दोघे बंधू देशातून पलायन करण्याच्या तयारीत गुंतले होते. देशातून थायलँडला पळ काढण्यात ते यशस्वी ठरले आहेत. मुंबई इमिग्रेशन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार लुथरा बंधूंनी शनिवारी रात्री क्लबला आग लागल्यानंतर त्याच पहाटे 5.30 वाजता 6 ई -1073 या विमानाने थायलँडमधील फुकेत शहर गाठले आहे. गोवा पोलिसांनी या दोन्ही आरोपीविऊद्ध ‘लूक आऊट सर्क्युलर’ जारी केले असून या दोन्ही मालकांना तातडीने पकडण्यासाठी इंटरपोलचीही मदत घेतली आहे. इंटरपोलने लुथरा बंधूंच्या शोधासाठी जागतिक ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. भारतीय सीबीआय व इंटरपोल यांच्या सहकार्यामुळे लुथरा बंधूंना पकडण्याच्या मोहिमेला गती प्राप्त झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article