Crime News: रागानं बघितल्यानं खून, धारदार शस्त्राने वार करत तरुणाला संपवलं
या घटनेप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे
कुरुदवाड : कुरुंदवाड शहरातील सिद्धार्थ चौकात एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या कारणावरून धारदार शस्त्रांनी वार करुन तरुणाचा खून करण्यात आला. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. अक्षय दीपक चव्हाण (वय २३, रा. कुरुंदवाड) असे त्याचे नाव आहे.
रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याची कुरुंदवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेची माहिती शहरात पसरताच तणावपूर्ण शांतता पसरली होती.
यश काळे (वय १९, रा. कुरुंदवाड), अमन जमीर दानवाडे (वय २२, रा. इचलकरंजी) व श्रीजय बडसकर (वय २२, रा. औरवाड) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी केवळ काही तासात या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू तीन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या कारणातून संशयितांकडून कृत्य केली आहे. या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार यांनी तपासाला गती दिली आहे.अक्षय आणि यश यांच्यात ५ जुलै रोजी एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या कारणावरून वाद झाला होता. याच वादातून यशने आपल्या दोन साथीदारांसह ६ जुलैला अक्षयवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवला.
या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथक तयार केले.
पथकाने शिरोली एमआयडीसी परिसरात सापळा रचत, केवळ पाच तासात संशयितांचा माग काढला. त्यांचा पाठलाग करत असताना ते पळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. संशयितांकडे चौकशी केली असता अक्षयबरोबर झालेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून त्यांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची कबुली दिली, अशी माहिती निरीक्षक कळमकर यांनी दिली.
या कारवाईत निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्यासह अंमलदार संजय कुंभार, सागर माने, प्रकाश पाटील, वसंत पिंगळे, महेश पाटील, महेश खोत, रुपेश माने, संजय पडवळ, अमित सर्जे, अशोक पवार, विशाल चौगुले, लखन पाटील, रोहित मदनि, सतीश सूर्यवंशी व हंबीरराव अतिग्रे यांचा समावेश आहे.