For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आपल्या हिताकरिता योग्य- अयोग्य मार्ग पहावा

06:50 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
आपल्या हिताकरिता योग्य  अयोग्य मार्ग पहावा
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

भगवंत म्हणाले, योगाभ्यास पूर्ण केलेल्या योग्याचे देहावसान योग्यकाळी होते त्यावेळी आत अग्नी व ज्योतीचा प्रकाश व बाहेर दिवस, शुक्लपक्ष आणि उत्तरायण चालू असते. ह्या कालावधीत देहावसान झालेले ब्रह्मवेत्ते जन ब्रह्माप्रत जातात.

पुढील श्लोकात भगवंत म्हणाले, आत धूरकट अग्नी, बाहेर रात्र, कृष्णपक्ष आणि दक्षिणायनाचे सहा महिने, या काळात देहावसान झालेला योगी चंद्रलोकापर्यंत जाऊन परत येतो.

Advertisement

धूमाने रात्र कृष्णार्ध दक्षिणायन जोडुनी । जाय तो परते येथ चंद्र-लोकास पावुनी ।।25।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, जर मरणाचे वेळी वात व कफ शरीरात दाटला असेल तर अंत:करणात अंधार गच्च भरून राहतो. सर्व इंद्रिये लाकडासारखी जड होतात, स्मरणशक्ती भ्रमात बुडते, मन वेडे होते व प्राण कोंडतो. अग्नीची उष्णता जाते, मग धूर होतो, त्या धुराने चेतना शरीरात कोंडलेली राहते. ज्याप्रमाणे पाण्याने गच्च भरलेले ढग चंद्राच्या आड आले की, गडद अंधारही नसतो आणि स्वच्छ उजेडही नसतो त्याप्रमाणे अर्धमेल्या अवस्थेत तो मरणाच्या वेळेची वाट पहात राहतो. त्याच्या मन, बुद्धि व इंद्रिये यांच्याभोवती धुराचे कोंदट वातावरण असते. त्यामुळे त्याने जन्मभर संपादन केलेला स्वरूप अभ्यासाचा मार्ग नष्ट होतो. अशा रीतीने ज्या योग्याचा देह पडतो, त्याचे चंद्रलोकापर्यंत जाणे घडते व नंतर तेथून तो माघारा फिरून पुन: मृत्युलोकात जन्मास येतो. अकाली मृत्यू तो हाच होय. आधी सांगितलेला अर्चिरादिमार्ग विना अडथळा आणि सुगम असल्याने कल्याणकारक असून मोक्षाची प्राप्ती करून देणारा आहे.

पुढील श्लोकात भगवंत सांगतात, जगाचे प्रकाशरूप व अंधाररूप असे हे दोन मार्ग नित्य आहेत. एकाने मनुष्य जन्ममरणाच्या पलीकडे जातो तर दुसऱ्याने तो पुनर्जन्म पावतो.

उजेड आणि अंधार दोन्ही मार्ग अनादि हे । सुटका करितो एक-एक फेऱ्यात टाकितो ।।  26 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, अशा या अनादि कालापासून चालत असलेल्या दोन वाटा आहेत. त्यापैकी एक सरळ व एक आडमार्गाची आहे. माणसाने आपले हित कशात आहे व अनहित कशात आहे हे ओळखावे. विष व अमृताला जो ओळखतो, त्याच्याने अमृत टाकवेल काय? त्याचप्रमाणे जो सरळ मार्गाने जातो तो आडमार्गाला जाणार नाही. म्हणून खरे व खोटे, याची पक्की परीक्षा करावी म्हणजे अकाली देह पडणार नाही. अर्चिरादि मार्ग चुकला व अकस्मात जर धूम्रमार्गात पडले तर संसाराच्या गाड्याला जुंपले जाऊन फिरतच रहावे लागेल. ह्याप्रमाणे एका मार्गाने ब्रह्मत्वास जाता येते आणि दुसऱ्या मार्गाने पुन्हा जन्माला येणे होते. ज्याला ब्रह्मप्राप्तीचे महत्त्व पटले आहे तो त्याचे कल्याण होण्यासाठी तो सूर्यमार्गाने ब्रह्मरूपास जाण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत असतो. त्यासाठी निरपेक्षतेने वाट्याला आलेले कर्म करून त्याचे फळ भगवंताना अर्पण करून संन्यस्त वृत्तीने राहत असतो. त्याने सर्व इच्छांचा त्याग करून त्याच्या ज्ञानेंद्रियांवर ताबा मिळवलेला असतो.

Advertisement
Tags :

.