सर्वात लांबीचा ओव्हरवॉटर रोड
इंजिनियरिंगचा आहे चमत्कार
अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतातील फ्लोरिडा कीज या बेटसमूहात एक अत्यंत अनोखा हायवे आहे. या मार्गाला पाण्यावर तयार करण्यात आलेला जगातील सर्वात मोठ्या मार्गांपैकी एक मानले जाते. याच्या आकर्षक रचनेमुळे याला इंजिनियरिंगचा चमत्कार मानण्यात येते. याची लांबी जाणून घेतल्यावर निश्चितपणे थक्क व्हायला होते.
गेफिरोफोबियाने पीडित लोक म्हणजेच ज्यांना पूलांबद्दल भीती वाटते, त्यांच्यासाठी हा महामार्ग प्रवास करण्याजोगा नाही. आता या महमार्गाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या महामार्गाच्या चहुबाजूला असलेले सौंदर्य पाहण्याजोगे आहे. हा महामार्ग पाहिल्यावर जणू तुम्ही ढगांच्या दिशेने प्रवास करत आहात असेच वाटू लागते.
हा ओव्हरसीज हायवे 133 मैल (181.9 किलोमीटर) लांब आहे. हा महामार्ग फ्लोरिडाच्या कीजला मुख्य भूमीशी जोडणारा आहे. याला युएस रुट1 किंवा युएस 1 या नावाने देखील ओळखले जाते. या महामार्गाचे डिझाइन हेन्री फ्लॅग्लर यांनी तयार केले होते. हा महामार्ग एकूण 44 बेटांना परस्परांशी जोडत असल्याने याचे महत्त्व येथे अधिकच आहे.
जर कुणी या महामार्गावरून प्रवास करत असेल तर त्याला स्वत:च्या प्रवासाचा 15 टक्क्यांपेक्षा अधिक वेळ या पुलांवरील प्रवासात घालवावा लागतो. याचमुळे हा महामार्ग गेफिरोफोबियाने ग्रस्त लोकांसाठी नाही. याचबरोबर ओव्हरसीज हायवेवर सर्वात लांब पूल ‘सेवन माइल ब्रिज’ देखील आहे. हा महामार्गाचा हा सर्वात प्रसिद्ध हिस्सा आहे. या ब्रिजसमवेत या महामार्गावर एकूण 42 पूल आहेत. या महामार्गावरून वाहनाने प्रवास करण्याचा अनुभव खरोखरच अद्भूत असतो.