‘दीर्घकालीन’ चे झाले ‘अल्पकालीन’!
केवळ तीन दिवसांच्या अधिवेशनावरून युरी यांची टीका
प्रतिनिधी/ पणजी
मार्च महिन्यात दीर्घ कालावधीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले होते. पण आपले शब्द पाळण्यात ते अपयशी ठरले असून केवळ तीन दिवसांचे अधिवेशन बोलावून विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्यास ते घाबरत असल्याचे सिद्ध केले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
त्यामागील मुख्य कारण म्हणजे या सरकारातील बहुतेक मंत्री भ्रष्टाचार, कमिशन यात गुंतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने राज्यात गैरव्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. अशा विविध प्रकारांमुळे या सरकारमध्ये विरोधकांना सामोरे जाण्याचे बळ राहिलेले नाही हेच सिद्ध होत आहे, असे आलेमाव यांनी पुढे म्हटले आहे.
येत्या 24 मार्चपासून विधानसभा अधिवेशनास प्रारंभ होणार असून त्यात केवळ तीन दिवसांचे कामकाज राहणार आहे. अशाप्रकारे अल्पकालीन अधिवेशन बोलावण्याचा निर्णय पाहता सरकार विरोधकांना सामोरे जाण्यास घाबरत आहे. जनतेला न्याय देण्याची जबाबदारी टाळत आहे, असे दिसून येते. राज्यात सध्या कॅश फॉर जॉब, जमीन रूपांतरण, सुलेमान सिद्दीकी प्रकरण, म्हादई जलतंटा, वाढते अपघात यासारखे असंख्य महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. परंतु नुकत्याच झालेल्या दोन दिवशीय अधिवेशनातही आम्ही सरकारच्या भ्रष्ट काराभारांचा पर्दाफाश केल्याने आता ते घाबरले आहेत, असे आलेमाव यांनी म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनाही घाबरतेय हे सरकार
या निर्णयामुळे लोकशाही तत्त्वे आणि आमदारांच्या अधिकारांवरसुद्धा गदा येत आहे. ही चिंतेची बाब असून त्याचा राज्यावरही परिणाम होणार आहे. हे सरकार विरोधकांना सामोरे जाण्यास तर घाबरतच आहे, आता ते सामाजिक कार्यकर्त्यांनाही घाबरू लागले आहे. म्हणूनच त्यांनी सत्तेचा गैरवापर करून रामा काणकोणकर सारख्या सामाजिक कार्यकर्त्याला तुऊंगात डांबले आहे. गोव्याची जनता या हुकूमशाही सरकारला माफ करणार नाही, असे आलेमाव म्हणाले.