For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्यमबाग रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

12:41 PM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
उद्यमबाग रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
Advertisement

काँक्रिटीकरणामुळे एकेरी वाहतूक : रहदारी पोलिसांच्या नेमणुकीची मागणी

Advertisement

बेळगाव : उद्यमबाग रोडवर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम केले जात आहे. यामुळे सध्या तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलापासून मजगाव कॉर्नरपर्यंत एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. बुधवारी रिक्षा व कार यामध्ये झालेल्या किरकोळ अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी रहदारी पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी केली जात आहे. मागील अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उद्यमबाग रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला अखेर सुरुवात झाली. मागील वर्षी रस्ता खोदाई करून काँक्रिटीकरणासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले होते.

त्यानंतर वर्षभर कोणतेच काम झाले नाही. आता मागील आठ दिवसांपासून काँक्रिटीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या शहराकडे येणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जात असून खानापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. खानापूर रोडमार्गे येणारी सर्व वाहतूक याच रस्त्याने येत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. विशेषत: सकाळी 8 ते 10 व सायंकाळी 6 ते 8 यावेळेत वाहतूक कोंडी अधिक प्रमाणात होत आहे. या दरम्यान कारखाने तसेच कार्यालयांची शिफ्ट संपत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. काही वेळा अर्धा तासाहून अधिक कालावधी लागत असल्याने वाहनचालक वैतागत आहेत.

Advertisement

रहदारी पोलीस नसल्याने कोंडी

बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास रिक्षा व कारमध्ये झालेल्या किरकोळ अपघाताने वाहतूक कोंडी झाली होती. बराच काळ रहदारी पोलीस नसल्याने कोंडी वाढत गेली. यामुळे मजगाव कॉर्नरपर्यंत अनेक वाहने थांबली होती. त्यामुळे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम होईपर्यंत रहदारी पोलिसांची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.