For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Umbraj News | महामार्गावर वाहनांचा वेढा! शिवडे येथील पंपावर अचानक का वाढली एवढी गर्दी?

11:41 AM May 11, 2026 IST | NEETA POTDAR
umbraj news   महामार्गावर वाहनांचा वेढा  शिवडे येथील पंपावर अचानक का वाढली एवढी गर्दी
Advertisement

                         उंब्रजजवळ CNG मिळवण्यासाठी वाहनधारकांचा तासन्तास संघर्ष

Advertisement

उंब्रज : महामार्गावरील शिवडे येथील सीएनजी पंपावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे. या परिस्थितीमुळे सीएनजी वाहनधारक वैतागून गेले असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सीएनजी गॅस उपलब्धतेबाबत कोणतेही निश्चित वेळापत्रक नसल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गॅस कधी मिळेल, किती वेळ प्रतीक्षा करावी लागेल याचा कोणताही भरोसा नसल्याने अनेक वाहनधारकांना
शिवडे येथे सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या अशा रांगा लागत आहेत.तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. विशेषतः कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा अधिक मनःस्ताप सहन करावा लागत आहे.प्रवासादरम्यान सीएनजी भरण्यासाठी थांबलेले वाहनधारक अनेकदा तासभरापेक्षा जास्त वेळ रांगेत अडकून पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महत्त्वाच्या कामासाठी निघालेल्या नागरिकांनाही याचा मोठा फटकाबसत आहे.

Advertisement

वेळेवर सीएनजी न मिळाल्यामुळे अनेकांना नियोजित ठिकाणी वेळेत पोहोचणे अशक्य होत असून प्रवासाचे संपूर्ण नियोजन कोलमडत आहे. वाढत्या प्रतीक्षेमुळे वाहनधारकांमध्ये नाराजी आहे.विशेष म्हणजे, सीएनजी पंपावरील वाहनांच्या रांगा थेट महामार्गावर येत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावत आहे. मोठी वाहने, खासगी कार, रिक्षा व मालवाहतूक वाहनांचीगर्दी वाढल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अचानक थांबणारी वाहने आणि रस्त्यावर निर्माण होणारी गर्दी यामुळे अपघाताचा धोका देखील वाढला असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

सीएनजी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना पुरेशा प्रमाणात गॅस उपलब्ध होत नसल्याने ही समस्या अधिक तीव्र बनली आहे. त्यामुळे शासनाने सीएनजी पुरवठ्यात नियमितता, मुबलकता आणि पारदर्शकता आणावी. तसेच पंपांवरील व्यवस्थापन सुधारावे, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.दरम्यान, शिवडे येथील परिस्थितीकडे प्रशासन व वाहतूक विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात; अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.