For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

अपघाती गोळीबार नव्हे, जमिनीच्या वादातून नातवाची हत्या; आजोबांसह पाच जणांवर गुन्हा

05:40 PM Oct 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
अपघाती गोळीबार नव्हे  जमिनीच्या वादातून नातवाची हत्या  आजोबांसह पाच जणांवर गुन्हा
Advertisement

पुणे : लोणावळ्यातील भुशी परिसरात अभय मराठे यांच्या गोळी लागून झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला हा परवानाधारक रायफलमधून झालेला अपघाती गोळीबार असल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिसांच्या तपासात जमिनीच्या वादातून अभय यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement

भुशी येथील मोतीराम हॉटेलमध्ये 12 बोअर रायफलमधून गोळी सुटून अभय यांच्या छातीत लागली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांनी घटनाक्रमाची सखोल चौकशी केली. त्यातून हा प्रकार अपघात नसून नियोजित हत्येचा असल्याचा निष्कर्ष समोर आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, मोतीराम राजीव मराठे (वय 83) आणि त्यांचा नातू अभय यांच्यात जमिनीच्या व्यवहारावरून पूर्वीपासून वाद होते. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये वाद झाला. या वादातून मोतीराम यांनी परवानाधारक रायफलमधून अभय यांच्या छातीत गोळी झाडल्याचा आरोप आहे.

Advertisement

या प्रकरणी मोतीराम मराठे यांच्यासह हिरामण मोतीराम मराठे, मनोज हिरामण मराठे, कविता हिरामण मराठे आणि राजश्री दशरथ पवार अशा पाच जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, घटनेनंतर मृत्यूचे खरे कारण लपवून प्रकरणाला अपघाती स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी तसेच इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास पुढे नेला. घटनेनंतर सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर हटवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचेही तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा पोलिसांकडून सुरू असून, हत्येमागील संपूर्ण घटनाक्रम आणि इतर संबंधितांची भूमिका तपासली जात आहे.

Advertisement
Tags :

.