For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

lonavala chikki got Gi tag | लोणावळा चिक्कीला ‘जीआय टॅग’ जागतिक स्तरावर निर्माण होणार वेगळी ओळख

09:05 PM Jul 19, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
lonavala chikki got gi tag    लोणावळा चिक्कीला ‘जीआय टॅग’ जागतिक स्तरावर निर्माण होणार वेगळी ओळख
Advertisement

त. भा. प्रतिनिधी, लोणावळा
1880 साली म्हणजेच सुमारे 146 वर्षांपूर्वी मजुरांसाठी ’एनर्जी बार’ म्हणून सुरू झालेली गुडदाणी म्हणजेच आजची चिक्की ही जीआय टॅग (भौगोलिक संकेत) मिळवून जागतिक स्तरावर लोणावळ्याची अधिकृत ओळख बनली आहे.
अठराव्या शतकाच्या अखेरीस लोणावळा खंडाळा परिसरात भोरघाटात अत्यंत प्रतिकुल नैसर्गिक परीस्थितीत इंग्रजांची ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीची रेल्वेलाईन टाकण्याचे काम कामे सुरू होती. त्यापाठोपाठ 1905 ते 1911 दरम्यान टाटा कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पतील (हायड्रो इलेक्ट्रीक कंपनीच्या) धरणांची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. या सर्वकाळात लोणावळा परिसरात गावातील मूळ लोकसंख्ये पेक्षा अधिक खूप मोठी कामगार वस्ती (लेबर पॅम्प) वास्तव्यास होती. दिवसभर शारीरिक कष्ट करणाऱ्या या मजूरांना मुसळधार पाऊस व हिवाळ्यात कडाक्मयाची थंडी यांना सामोरे जात मेहनतीची काम करावी लागत. यासाठी त्यांना दैनंदिन आहारा व्यतिरिक्त अधिक शक्तिवर्धक आहाराची गरज होती. आणि त्यासाठी अतिशय स्वस्त आणि सहजपणे उपलब्ध असणाऱ्या गुळ आणि शेंगदाण्याला अन्य पर्याय नव्हता.
या मजुरांसाठी एनर्जी फूड म्हणून गुळ व शेंगदाण्याचा वापर सुरू झाला. यापैकी गुळ अथवा शेंगदाणे दोन्हीही इथे होत नाहीत. पण हाच सर्वात स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा पौष्टिक आहार असल्याने इथल्या स्थानिक व्यावसायिकांनी पळसाच्या पानातून शेंगदाणे आणि गुळ या पासून बनविलेली गुडदाणी तयार करून विकण्यास सुरूवात केली. पुढे हीच गुडदाणी चिक्की म्हणून प्रसिद्ध झाली. आज लोणावळा शहरामध्ये चिक्की बनवणारे व विक्री करणारे अनेक व्यवसायिक आहेत. साधारणपणे 25 ते 30 प्रकारच्या चिक्की या बनवल्या जातात. लोणावळा शहरांमधील या चिक्कीला जीआय टॅग प्राप्त झाल्यामुळे तिची ओळख आता जागतिक स्तरावर होणार आहे व लोणावळा शहर देखील ‘चिक्की हब’ म्हणून या पुढील काळात जगभर ओळखले जाणार आहे.
लोणावळा शहरातील चिक्कीला जीआय टॅग मिळाल्यामुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे तसेच या पुढील काळात लोणावळा शहरांमध्ये आल्यानंतर चिक्की हा पदार्थ प्रत्येक जण विश्वासाने व येथील भौगोलिक ओळख म्हणून विकत घेईल, यात तीळ मात्र शंका नाही, असे येथील चिक्की विव्रेते आदित्य व्यास यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.