For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थेट पाईपलाईनवरून पुन्हा राजकीय फटाके; लोकसभा निवडणुकीत ठरणार प्रचाराचा मुद्दा

01:19 PM Mar 14, 2024 IST | Abhijeet Khandekar
थेट पाईपलाईनवरून पुन्हा राजकीय फटाके  लोकसभा निवडणुकीत ठरणार प्रचाराचा मुद्दा
Satej Patil MP Mahadik
Advertisement

योजना पूर्तीचे महाविकास आघाडी घेणार श्रेय; गळती, अपूर्ण कामावरून महायुती करणार कोंडी

विनोद सावंत कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट पाईपलाईन योजना हा पुन्हा प्रचाराचा मुद्दा ठरत आहे. एकीकडे काँग्रेस शहरवासियांचे 40 वर्षाचे स्वप्न पूर्ण केल्याचा दावा करत आहे. दुसरीकडे योजना पूर्ण होऊनही शहरात पाण्याची समस्या कायम असल्याने तसेच वारंवार पाईपलाईनला गळती लागत असल्यावरून महायुतीकडून महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी थेट पाईपलाईनच्या कामाच्या पाहणीवेळी योजनेची कमिटीमार्फत चौकशी करणार असून श्वेतपत्रिकेची मागणी केली आहे. एकूणच थेट पाईपलाईनवरून या निवडणुकीत राजकीय फटके वाजाणार आहेत.

Advertisement

शहरवासियांना स्वच्छ, मुबलक पाणी मिळण्यासाठी काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची मागणी झाली. 40 वर्षापासून यासाठी शहरवासियांनी आंदोलने केली. 2014 मध्ये केंद्राकडून 488 कोटी रूपयांना मंजुरी मिळाली. आमदार सतेज पाटील यांनी आमदारकी पणाला लावून योजना मंजूर करून आणली, हे वास्तव आहे. परंतु धरण क्षेत्रातील काम आणि कोरोनामुळे मुदतीमध्ये काम पूर्ण होऊ शकले नाही. योजनेचे काम रखडल्याने थेट पाईपलाईन योजना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राजकीय मुद्दा बनली. शहरातील कोपरा सभांमध्ये या योजनेवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. ठिकपुर्ली येथील पुलाचे काम 25 लाखांचे असताना अडीच कोटींचे दाखवल्याचा भांडाफोड भाजप-ताराराणी आघाडीने केला. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत निकृष्ट दर्जाचे काम आणि ढपला हा विरोधकांचा प्रचाराचा मुद्दा ठरला.

थेट पाईपलाईनचे अखेर गतवर्षी नोव्हेंबरमध्ये काम पूर्ण झाले. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी जल्लोष केला. थाटामाटात योजनेसाठी राबलेल्यांचा सत्कारही झाला. यामध्ये गेले 10 वर्ष महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेना ठाकरे गट आणि सध्या महायुतीत गेलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला जराही भनक लागू दिली नाही. एकूणच योजनेचे श्रेय घेण्यात काँग्रेस यशस्वी झाली. योजना पूर्ण केल्याचे नक्कीच आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पथ्यावर पडणार, असेच चित्र होते. परंतु योजना पूर्ण होऊन चार महिने झाले तरी संपूर्ण शहरात अद्यापी थेट पाईपलाईनचे पाणी पोहोचलेले नाही. तीन महिन्यात पाच ते सहा वेळा थेट पाईपलाईनला गळती लागली आहे. हाच मुद्दा आता महायुतीकडून पुढे रेटला जात आहे.

Advertisement

विमानतळ नुतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी आता थेट पाईपलाईनमध्येही लक्ष घालावे लागेल, असे सांगितले. योजना पूर्ण होण्यापूर्वी हेच महाडिक थेट पाईपलाईन योजनेबाबत ज्यांचे श्रेय त्यांना द्यावे. थेट पाईपलाईन त्यांना लखलाभ, असे विधान करत होते. आता मात्र, थेट पाईपलाईनमध्ये लक्ष घालणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शहरातील पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले असले तरी आगामी निवडणुकीत त्यांच्याकडून रखडलेली थेट पाईपलाईन हा विषय नक्कीच प्रचाराचा मुद्दा असण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरचा पाणी प्रश्न पेटला
थेट पाईपलाईन योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करत श्वेतपत्रिकेची मागणी खासदार महाडिक यांनी केली आहे. कामातील धक्कादायक प्रकार त्यांनी निदर्शनास आणले आहेत. त्यामुळे शहरातील पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे.

थेट पाईपलाईनवरून कलगीतुरा रंगणार
आगामी निवडणुकांमध्ये योजना पूर्ण केल्यावरून आणि पाईपलाईनला लागलेली गळती, पाणी समस्या यावरून काँग्रेस आणि महायुतीमध्ये कलगीतुरा रंगणार आहे. यामध्ये जनता कोणाच्या बाजूने कौल देणार, हे येणार काळाच ठरवणार आहे.

Advertisement
Tags :

.