For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकोत्सव ‘अंत्योदया’, ‘सर्वोदय’, ‘ग्रामोदय’ तत्त्वांचा

10:58 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
लोकोत्सव ‘अंत्योदया’  ‘सर्वोदय’  ‘ग्रामोदय’ तत्त्वांचा
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे उद्गार : काणकोणात 23 व्या लोकोत्सवाचे उद्घाटन,विविध मान्यवरांचा सत्कार

Advertisement

काणकोण : काणकोणच्या आदर्श युवा संघाचा लोकोत्सव हा नुसता अंत्योदय तत्त्वावरील नसून तो सर्वोदय आणि ग्रामोदय करणाराही आहे. साधनसुविधा व मानव विकास तळागाळापर्यंत पोहोचविणारा असा हा सर्वव्यापी महोत्सव आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी 23 व्या लोकोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना व्यक्त केले. काणकोणच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या योजना राबविल्या जातात त्या चांगल्या कार्याला सर्वांनी पक्षभेद बाजूला ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या उद्घाटन सोहळ्याच्या व्यासपीठावर उत्तर प्रदेशचे सभापती सतीश महाना, गोवा विधानसभेचे उपसभापती जोशुआ डिसोझा, मडगावचे आमदार दिगंबर कामत, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक तसेच ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चे चेअरमन किरण ठाकूर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर, सरपंच आनंदू देसाई, सेजल गावकर, प्रीतल फर्नांडिस, सविता तवडकर, निशा च्यारी, बलराम शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अंकुश गावकर, सचिव अशोक गावकर, जिल्हा पंचायत सदस्य शाणू गावकर, खुशाली वेळीप आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वकर्मा या योजनेत जे 18 विभाग देण्यात आलेले आहेत ते गावच्या विकासाला पूरक आणि स्वयंपूर्णतेकडे नेणारे आहेत तसेच पंतप्रधानांच्या नवभारत आणि विकसित देश घडविण्याच्या धोरणाला चालना देणारे आहेत. त्यामुळे कौशल्यपूर्ण गोवा बनविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले. लोकोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सभापती तवडकर यांचे त्यांनी अभिनंदन केले.

मान्यवरांचा सत्कार

Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रशासन, सामाजिक सेवा, पत्रकारिता या क्षेत्रांत उत्तम कामगिरी बजावलेल्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यात ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक तसेच ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’चे चेअरमन किरण ठाकूर, गोव्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल, कोकणी अकादमीच्या सदस्य सचिव मेघना शेटगावकर, आयएएस अधिकारी संदीप जॅकीस, प्रदीप डिकॉस्ता, तेजश्री व्ही. पै, पत्रकार सुशांत कुंकळ्येकर, ईशा मयूर सावंत, सुनील गोसावी यांचा समावेश होता.

वनौषधी, गोमंतकीय खाद्यपदार्थ

या लोकोत्सवात औषधी वनस्पती, ग्रामीण खाद्यपदार्थ, जैवविविधता व्यवस्थापन मंडळ, कृषी संचालनालय यांच्या विविध स्टॉल्सबरोबरच गोपीनाथ गावस यांच्याकडील पुरातन वस्तूंचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. जवळजवळ 500 स्वयंसाहाय्य गटांचे तसेच 65 पेक्षा अधिक वनौषधींचे स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. या सर्व स्टॉल्सना मुख्यमंत्री तसेच अन्य मान्यवरांनी भेटी दिल्या आणि सहभागी झालेल्यांचे कौतुक केले.

ग्रामीण खेळ, लोकसंस्कृतीचे दर्शन

ग्रामीण खेळांना प्राधान्य देण्यासह हरवलेली संस्कृती नव्या पिढीसमोर ठेवण्याचा आदर्श युवा संघाचा हा प्रयत्न असून विविध ग्रामीण खेळ, लोकसंस्कृतीचे प्रदर्शन याबरोबर शालेय, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने लोकांनी याचा मनमुराद आनंद घेतला.

अस्सल गोवा पाहण्यासाठी लोकोत्सव उत्तम माध्यम : महाना

सतत आठ वेळा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून आलेल्या आणि सध्या सभापती असलेल्या सतीश महाना यांनी श्रमदान आणि योगदान या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. मोबाईल संस्कृतीमुळे ग्रामीण संस्कृती आज हिरावत गेली आहे. आपण घरपण आणि माणुसकी विसरत चाललो आहोत. त्यामुळे अस्सल गोवा आणि भारतीय संस्कृती पाहण्यासाठी लोकोत्सव हे एक उत्तम माध्यम आहे, असे मत सभापती महाना यांनी यावेळी मांडले

देश विश्वगुरू व्हायचा असेल, तर प्रत्येक तालुका विश्वगुरू व्हायला हवा. समाजात एक प्रकारची क्रांती घडायला हवी. त्यासाठी सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन जायला हवे आणि ते काम सभापती तवडकर लोकोत्सवाच्या माध्यमातून करत असल्याचे मत आमदार दिगंबर कामत यांनी व्यक्त केले, तर गोव्याची अस्मिता राखून ठेवण्याचे काम लोकोत्सवातून होत असल्याचे मत उपसभापती डिसोझा यांनी व्यक्त केले.

गावकऱ्यांचे विचार प्रगल्भ करण्याचा उद्देश : तवडकर

गावची एकता, बंधुता आणि माणुसकी टिकून ठेवतानाच गावच्या लोकांचे विचार प्रगल्भ आणि ताकदवान व्हावेत या उद्देशाने लोकोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे जाणून त्याचप्रमाणे ग्रामीण संस्कृती टिकायला हवी हा उद्देश समोर ठेवून 23 वर्षांपूर्वी कार्यकर्त्याच्या बळावर लोकोत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आणि त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. त्याचे सर्व श्रेय आपल्यावर विश्वास ठेवलेले आदर्श युवा संघाचे कार्यकर्ते, बलराम शिक्षणसंस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना जाते. संस्कृती टिकली नाही आणि माणुसकी जपली नाही, तर कोणत्याही भागाचा विकास होणे अशक्य असल्याचे मत रमेश तवडकर यांनी व्यक्त केले.

बलराम डे केअर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीतानंतर निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता तवडकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गावकर यांनी केले, तर अशोक गावकर यांनी आभार मानले. संध्याकाळच्या सत्रात हरियाणाचे सभापती ग्यानचंद गुप्ता, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आमदार केदार नाईक, राजेश फळदेसाई, माजी आमदार दामोदर नाईक, काणकोण महिला मोर्चाच्या अध्यक्षा विंदा सतरकर, लोलयेचे उपसरपंच चंद्रकांत सुदिर, पैंगीणचे उपसरपंच सुनील पैंगणकर, खोतीगावच्या उपसरपंच पूनम गावकर, आगोंदच्या उपसरपंच जॅनिशा फर्नांडिस, श्रीस्थळचे उपसरपंच शिवा देशमुख, श्री बलराम शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष अंकुश गावकर आणि आदर्श युवा संघाचे सचिव अशोक गावकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Advertisement
Tags :

.