लोकमान्य टिळक माझे प्रेरणास्थान!
ज्येष्ठ लेखिका-राज्यसभेच्या सदस्या सुधा मूर्ती यांचे प्रतिपादन : लोकमान्य पुरस्काराने सन्मान
नवी दिल्ली : लोकमान्य टिळक हे माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊनच मी समाजकार्यात हिरीरीने भाग घेऊ शकले. तसेच, देवदासींच्या जीवनात कायापालट करू शकले, असे ज्येष्ठ समाजसेविका, प्रख्यात लेखिका व राज्यसभेच्या सदस्या सुधा मूर्ती यांनी येथे सांगितले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने (टिळक स्वराज्य संघ) भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांच्या 104 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सोहळ्यात सुधा मूर्ती यांना नुकताच ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे पुरस्काराचे वितरण झाले.
एक लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वऊप आहे. सुधा मूर्ती यांनी पुरस्काराची रक्कम पुण्यातील ‘मेक इन लाईफ’ या संस्थेला देत असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार डॉ. शाहू छत्रपती महाराज, टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक, विश्वस्त डॉ. प्रणति रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रणति टिळक यांनी लिहिलेल्या ‘लिजेंडरी लोकमान्य‘ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन शरद पवार यांनी केले. तसेच, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथावर आधारित अभ्यासक्रमाचे पोस्टरदेखील प्रकाशित करण्यात आले.
सुधा मूर्ती म्हणाल्या, लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याचा मनस्वी आनंद झाला आहे. तो माहेरचा सन्मान असल्याचे मी मानते. माझे घराणे मूळचे कोल्हापूरचे. परंतु, वडिलांच्या नोकरीमुळे आमचे लहानपण कर्नाटकात गेले. लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील प्रसंगांची माहिती आजीने सांगितलेल्या गोष्टींतून मिळाली. लोकमान्यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सव, शिवजयंती या कार्यातून मला समाजकार्याची प्रेरणा मिळाली, असे सांगतानाच, खडतर परिस्थितीवर मात करण्याचा मूलमंत्र लोकमान्यांच्या जीवनचरित्रातून मिळतो. लोकमान्य टिळक हे महान व्यक्ती, तत्त्ववेत्ते आणि अग्रणी नेते होते. लोकमान्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी केलेला त्याग, अपार कष्ट आणि राष्ट्रप्रेम यांच्यामधून मला प्रेरणा मिळाली.
यावेळी पवार म्हणाले, भारताला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर, मर्यादित नागरिकांच्या सहभागापेक्षा समाजातील शेवटच्या घटकांचा सहभाग झाला पाहिजे. या दृष्टीने लोकमान्य टिळकांनी शेवटच्या घटकांतील नागरिकांना स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी करून घेतले. छत्रपती आणि शाहू घराण्याचे संबंध दीडशे वर्षांपासून आहेत. लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज विचारांनी वेगळे असले तरी, खऱ्या अर्थाने मित्र होते. पुढे जाताना सुधारणा करून घ्यायच्या, कशाला प्राधान्य द्यायचे हे त्यांना माहीत होते. काही गोष्टींमध्ये दुमत असले तरी जयंतराव टिळक आणि छत्रपती शहाजी महाराज यांचे ऋणानुबंध होते. दोन्ही घराणी सुधारणावादी असल्याचे म्हटले आहे.
तीन सन्मानमूर्ती एकत्र...
पुरस्कार सोहळ्यात गुऊवारी तीन पुरस्कारार्थी एकत्र आले होते. सुधा मूर्ती यांना गुऊवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर 2004 मध्ये नारायण मूर्ती यांना याच पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाही टिळक पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. कालच्या पुरस्कार सोहळ्यात हे तीन पुरस्कारार्थी एकत्र उपस्थित होते. तीन पुरस्कारार्थींचा एकत्र योग जुळून आला असल्याचा टिळक स्मारक ट्रस्टला अभिमान असल्याचे डॉ. दीपक टिळक यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.