For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकमान्य सोसायटीची सर्वसाधारण सभा उत्साहात

12:17 PM Sep 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
लोकमान्य सोसायटीची सर्वसाधारण सभा उत्साहात
Advertisement

आर्थिक वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प-लेखा परीक्षण अहवालाला मंजुरी : एकूण व्यवसाय 16,800 कोटींवर

Advertisement

पुणे : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता ऐतिहासिक टिळक वाडा, नारायण पेठ, पुणे येथे उत्साहात संपन्न झाली. सभेत सन् 2024-25 या आर्थिक वर्षातील नफा-तोटा पत्रक व ताळेबंद वाचून दाखवून मंजूर करण्यात आले. चालू आर्थिक वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प मांडून मंजूर करण्यात आला. लेखा परीक्षण अहवाल व सोसायटीच्या उपनियमांमध्ये सुचविलेले बदल यांनाही मंजुरी देण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन डॉ. किरण ठाकुर होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक प्रसाद ठाकुर, गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, डॉ. दामोदर वागळे, विठ्ठल प्रभू, सई ठाकुर-बिजलानी उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात झाली. चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांनी अध्यक्षीय भाषण करताना सन् 2024-25 या आर्थिक वर्षातील सोसायटीच्या कामगिरीचा आढावा घेतला. दि. 31 मार्च 2025 रोजीच्या स्थितीनुसार सोसायटीच्या एकूण ठेवी रु.9,706 कोटी, तर कर्जवाटप रु. 7,079 कोटी एवढे असून कार्यकारी भांडवल रु. 10,087 कोटी आहे. सोसायटीचा निव्वळ नफा रु. 27.52 कोटी इतका झाला आहे. एकूण व्यवसाय  तब्बल रु. 16,800 कोटींवर पोहोचला आहे. या यशस्वी कामगिरीवर उपस्थित सभासदांनी टाळ्यांचा गजर करून समाधान व्यक्त केले.

Advertisement

मुख्य वित्त अधिकारी वीरसिंग भोसले यांनी सभेची नोटीस व मागील वार्षिक सभेत संमत ठराव वाचून दाखवले. गंगानंद तेवरे यांनी नफा-तोटा पत्रक व ताळेबंदसह नफ्याच्या विनियोगाचा प्रस्ताव मांडला. संचालक प्रसाद ठाकुर यांनी संचालक मंडळाची जबाबदारी विधान (Director`s Responsibility Statement)) वाचून दाखविले. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत दीक्षित यांनी उपनियमांमध्ये सुचविलेले बदल तसेच नव्या शाखांच्या प्रस्तावित ठिकाणांची माहिती सभासदांना दिली. सभासदांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना संचालक प्रसाद ठाकुर आणि सीएफओ वीरसिंग भोसले यांनी समाधानकारक उत्तरे दिली. सर्व ठराव सभासदांनी एकमताने मंजूर केले. काही विकासात्मक सूचना सभासदांनी दिल्या असून त्या लवकरात लवकर राबविण्याचे आश्वासन संचालक मंडळाने दिले. सभासदांनी सोसायटीच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Tags :

.