For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लोकमान्य’च्या कार्यामुळे सहकार चळवळीला नवी दिशा : नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ; ‘लोकमान्य’च्या घोले रोड शाखेचे स्थलांतर

10:56 AM Sep 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘लोकमान्य’च्या कार्यामुळे सहकार चळवळीला नवी दिशा   नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ  ‘लोकमान्य’च्या घोले रोड शाखेचे स्थलांतर
Advertisement

पुणे | त. भा. प्रतिनिधी : सहकारातून समृद्धी आणि सहकारातून सामाजिक बांधिलकी हा दृष्टिकोन ठेवून वाटचाल केल्यास सर्वांचीच प्रगती साधता येते. ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी’ याच मार्गाने यशस्वी वाटचाल करीत असून, संस्थेच्या कार्यामुळे सहकार चळवळीला नवी दिशा मिळत आहे, असे गौरवोद्गार राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी काढले.

Advertisement

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि.च्या घोले रोड शाखेच्या स्थलांतर सोहळ्यात त्या बोलत होत्या. या वेळी पुणे महानगरपालिकेतील नगरसेविका प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे, ‘लोकमान्य’चे संस्थापक-अध्यक्ष व ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख डॉ. किरण ठाकुर, उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन थामणेकर, संचालिका सई ठाकुर-बिजलानी, मुख्य सुरक्षा अधिकारी दीपक गुरूंग, पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

‘लोकमान्य’ची मोठी झेप

मिसाळ म्हणाल्या की, एखादी बँक किंवा सोसायटी मोठी होण्यामागे अनेकांचे कष्ट असतात. खातेदार, ठेवीदार, संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाचा सहभाग व सहकार्य संस्थेच्या प्रगतीसाठी आवश्यक असते. आपण 1987च्या सुमारास बँकेचे संचालकपद सांभाळले असल्याने या क्षेत्रातील अनुभवातून हे सांगत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement

डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लोकमान्य’ने मोठी झेप घेतली आहे. संस्थेच्या 213 शाखा असून, 12 हजार 500 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या यशामागे संस्थेतील प्रत्येक घटकाचे मोठे परिश्रम असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.

सहकारातून समृद्धी, सामाजिक बांधिलकीही कायम

विश्वास हा सहकार चळवळीचा प्रमुख आधार आहे. एकेकाळी सहकार टिकणार नाही, असे म्हटले जात होते. मात्र ग्राहकांना योग्य सेवा देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यात सहकार क्षेत्राला यश आले. त्यामुळे ही चळवळ आजही टिकून असून, सहकारातून मोठी समृद्धी निर्माण झाली आहे, असे मिसाळ म्हणाल्या.

केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी मागील काही वर्षांत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. 2024 मध्ये सहकार धोरण आणण्यात आले. तसेच पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवून सहकारातील प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यामुळे सहकार क्षेत्राला नवे वळण मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले.

‘लोकमान्य’ सोसायटी सहकाराबरोबरच शिक्षण, आरोग्य, संस्कृती आणि अन्य क्षेत्रांतही योगदान देत आहे. आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन कायम ठेवणे ही संस्थेची वैशिष्ट्यपूर्ण बाब असून, हा आदर्श इतरांनीही स्वीकारावा, अशी अपेक्षा मिसाळ यांनी व्यक्त केली.

‘लोकमान्य’ नाम ही काफी है : प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे

प्रा. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी ‘लोकमान्य’च्या 31 वर्षांच्या वाटचालीचे कौतुक केले. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांत संस्थेने चांगले जाळे निर्माण केले असून, रोजगारनिर्मितीबरोबरच नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठीही संस्था कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

हुतात्मा राजगुरू यांच्या वंशजांच्या वास्तूत ‘लोकमान्य’ची शाखा सुरू होणे ही सौभाग्याची बाब असल्याचेही त्या म्हणाल्या. या परिसरातच आपले घर असल्याने ‘लोकमान्य’ची शाखा येथे सुरू झाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी नमूद केले.

 213 शाखा, 12 हजार 500 कोटींच्या ठेवी

डॉ. किरण ठाकुर यांनी ‘लोकमान्य’च्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. 1995 मध्ये बेळगाव येथे संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. गेल्या 31 वर्षांत संस्थेच्या 213 शाखा झाल्या असून, 12 हजार 500 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. आजमितीला दोन हजारांहून अधिक कर्मचारी संस्थेत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

मान्यवरांचा सत्कार

कार्यक्रमात लेखक श्याम भुर्के, शैलेश टिळक, हुतात्मा राजगुरू यांच्या पुढील पिढीतील हर्षवर्धन राजगुरू, सत्यशील राजगुरू यांच्यासह सुनील गावसकर, ज्ञानेश्वर गुरव आणि अन्य मान्यवरांचा डॉ. किरण ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुशील जाधव यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.