लोकमान्य सोसायटीतर्फे जागतिक महिला दिन साजरा
मान्यवरांचा महिला सबलीकरणावर भर : महिला कर्मचाऱ्यांना दिल्या शुभेच्छा
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने जागतिक महिला दिनाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुऊवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमात मुख्य अतिथी डॉ. सोनाली सरनोबत यांचा मित्रा गरगट्टी यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. तसेच रजनी नाडगौडा यांनी अन्य अतिथींचा सन्मान केला. डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिला सबलीकरणावर भर दिला आणि आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या मधुमेह, कर्करोग, संधिवात, कोलेस्ट्रेरॉल यांसारख्या रोगांविषयी जागरुकता निर्माण केली.
त्यांनी पॅकबंद साखरयुक्त पदार्थ लहान मुलांसाठी हानिकारक कसे आहेत, महिलांमध्ये होणारे हार्मोनल बदल, तसेच व्यायाम, योगा आणि पोषणयुक्त आहार (ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारखे मिलेट्स) यांचे रोजच्या जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. यावेळी लोकमान्य सोसायटीचे आभार मानत त्यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास मित्रा गरगट्टी, आरती परब, विनिता प्रभू, सारिका गावडे आणि राधिका वागळे आदी मान्यवर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती गंभीर व राजश्री घोरपडे यांनी केले. मयूरा धामणेकर यांनी स्वागतपर भाषण केले. मान्यवरांचा परिचय स्नेहा कुलकर्णी यांनी करून दिला. आभार आकांक्षा सटवाणी यांनी मानले. कार्यक्रमाला लोकमान्य सोसायटीच्या सर्व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.