‘लोकमान्य’चा क्रस्ना डायग्नोस्टिकशी करार
सोसायटीचा रोगनिदान चाचण्यांसाठी झाला करार : ग्राहक सभासदांना सवलतीत सुविधा
पुणे : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य साधून ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ आणि क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. करारानुसार लोकमान्य सोसायटीच्या ग्राहक व सभासदांसाठी विविध रोगनिदान चाचण्यांसाठी हेल्थ प्रिव्हिलेज कार्डद्वारे सवलत या कराराद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व क्रस्ना डायग्नोस्टिक्सचे अध्यक्ष राजेंद्र मुथा यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकमान्य सोसायटीचे पुणे विभागीय प्रमुख सुशील जाधव व क्रस्ना डायग्नोस्टिक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक यश मुथा यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे उपस्थित होते.
लोकमान्य सोसायटीचा ग्राहक व सभासद वर्ग लक्षात घेता तऊण वर्गासोबतच ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. अशा सर्व ग्राहक-सभासद व त्यांच्या कुटुंबीयांसाठी लोकमान्य सोसायटीने परिपूर्ण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने क्रस्ना डायग्नोस्टिक लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या अनुषंगाने लोकमान्य सोसायटीच्या ग्राहक व सभासदांना महाराष्ट्रात क्रस्ना डायग्नोस्टिक सेवा देत असलेल्या विविध राज्यांमध्ये विविध रोगनिदान चाचण्यांसाठी दहा ते चाळीस टक्के इतकी सवलत उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या होम सॅम्पल कलेक्शन सेवांचा लाभदेखील लोकमान्यच्या ग्राहक, सभासदांना घेता येणार आहे.
या कराराविषयी अधिक माहिती देताना ‘लोकमान्यचे पुणे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांनी सांगितले की ग्राहक, सभासदांना व त्यांच्या कुटुंबीयांना सुदृढ आरोग्य लाभावे, त्या सर्वांच्या आरोग्य सुविधांचा प्राधान्याने विचार करून आरोग्य सुविधा सवलतीत उपलब्ध करून देण्याच्या हेतूने लोकमान्य सोसायटीने हा पुढाकार घेतला आहे. या सेवांविषयी व्यवस्थापकीय संचालक यश मुथा म्हणाले की, लोकमान्य सोसायटीचा ग्राहक व सभासदवर्ग मोठा आहे. त्यांच्या ग्राहक व सभासदांसाठी गुणवत्तापूर्ण रोगनिदान सेवांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ग्राहक व सभासदांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व या सेवा संबंधातील अधिक माहितीसाठी लोकमान्य सोसायटीच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.