धावपटूंच्या उत्साहाने गाजणार लोकमान्य मॅरेथॉन
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आबालवृद्ध स्पर्धकांचा समावेश
बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी आणि लोककल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकमान्य मॅरेथॉन 2025 या बहुप्रतीक्षित उपक्रमाचे आयोजन 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 6:30 वाजता आरपीडी कॉलेज ग्राउंड, बेळगाव येथे होणार आहे. फिटनेस, सामाजिक बांधिलकी, आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्राया या स्पर्धेला यंदा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या विशेष प्रसंगी भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नवीन 3 किमी धावगट
3 किमी धावण्याच्या विभागाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे, 10 वर्षांखालील मुलांसाठी खास नवीन स्पर्धा जोडण्यात आली आहे. या विभागामुळे चिमुकल्यांना आपल्या उत्साहाने आणि धैर्याने सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, या गटातील सर्व विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
- ज्येष्ठ नागरिकांचा उल्लेखनीय सहभाग : लोकमान्य मॅरेथॉनमध्ये यंदा ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. वयाची सीमा ओलांडून उत्साह आणि जिद्द दाखवत त्यांनी या स्पर्धेला सामाजिक संदेशही दिला आहे.
- प्रभाकर देसाई (वय 88 वर्षे) : आपले जीवन आरोग्यदायी बनवा. ’तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या तत्त्वावर माझा विश्वास आहे आणि म्हणूनच मी या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो आहे.
- दामोदर कुलकर्णी (वय 79 वर्षे) : मी निवृत्त लष्करी अधिकारी आहे. माझ्या मते, वय हे फक्त एक संख्या आहे, हा आत्मविश्वास प्रत्येकाला वाटावा, यासाठीच मी धावत आहे.
- मारुती कणबरकर (वय 78 वर्षे) : लहानपणापासून मी खेळाडू आहे. मी 100 हून अधिक पदके जिंकली आहेत. शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी मी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आहे.
रन इंडिया प्लॅटफॉर्मचे मनोगत : रन इंडियाचे संस्थापक राहुल पवार यांनी सांगितले कि ‘यंदा रन इंडिया प्लॅटफॉर्मवर लोकमान्य मॅरेथॉनला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, 3 वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते 88 वर्षे वयोगटातील धावपटूंचा लाभलेला अभूतपूर्व प्रतिसाद आमच्यासाठी अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला आहे. बेळगाव शहराने प्रथमच नोंदणीसाठी नवे उच्चांक गाठले आहेत. लोकांच्या उत्साहपूर्ण सहभागाचे आणि सामूहिक ऊर्जेचे ते प्रतिबिंब आहे. आम्ही लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे मन:पूर्वक आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी एकता, आरोग्य आणि सामंजस्य यांना प्रोत्साहन देणारे असे उत्कृष्ट उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक ऐक्याचा आणि फिटनेसचा आदर्श निर्माण करत एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे, आणि या प्रवासाचा भाग होण्याचा आम्हाला अतिशय अभिमान वाटतो.’ सहभागी स्पर्धकांच्या मदतीसाठी आणि अधिक माहितीसाठी 7795972635, 8618034063, 8123374824 या क्रमांकावर संपर्क साधावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
महत्वाच्या सूचना
मॅरेथॉन किट वाटप : सर्व सहभागी स्पर्धकांनी आज 11 जानेवारी रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 या वेळेत आरपीडी कॉलेज ग्राउंड येथे आपले किट घेणे अनिवार्य आहे. किटमध्ये बिब, टी-शर्ट, मॅरेथॉनसाठी आवश्यक वस्तूंचा समावेश असेल. नोंदणी पुष्टीपत्र/संदेश सोबत आणणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या दिवशी कोणतीही नोंदणी केली जाणार नाही.