‘लोकमान्य’कडून कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
महिला सक्षमीकरणासाठी उचललेले पाऊल प्रेरणादायी: पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन
रत्नागिरी
प्रत्येक क्षेत्रात आज महिला सक्षमपणे योगदान देत आहेत. व्यासपीठावर उपस्थित जयश्री गायकवाड या कायदा व सुव्यवस्था तर शुभांगी साठे प्रशासन सांभाळत आहेत. रेश्मा जोशी उद्योगक्षेत्रात कार्यरत आहेत. जिल्ह्यात महिला बचतगट देशातील पहिली हाऊसबोट चालवित आहेत. ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आणि ‘तरुण भारत संवाद’ परिवाराचे मी कौतुक करतो, की त्यांनी आज विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला आहे. या महिलांचा आदर्श ठेवून प्रत्येक महिलेने त्यांच्याप्रमाणे आपला ठसा उमटवावा, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
महिला दिनाचे औचित्य साधून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे ‘उन्नती २०२५ - जल्लोष मराठी भाषेचा’ या विशेष लोककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या निवडक महिलांचा सन्मान सोहळा हॉटेल विवेक येथे पार पडला. यावेळी सामंत बोलत होते. व्यासपीठावर ‘तरूण भारत संवाद’च्या संचालिका सई ठाकूर-बिजलानी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जागृत मोटर्सच्या संचालिका रेश्मा जोशी, लोकमान्यचे रिजनल मॅनेजर नितीन सिनकर, रत्नागिरी आवृत्तीप्रमुख महेंद्र पराडकर आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत. राज्याच्या मुख्य सचिव देखील महिला आहेत. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाही एक महिला होत्या महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांना २१ सिटर पर्यटन बस देण्यात आली होती. आता आणखी गाड्यांची मागणी महिलावर्गातून होत आहे. बचत गटाच्या महिलांनी आता पापड, कुळीथपीठ या पलिकडे जावून व्यवसाय केला पाहिजे. मंत्री म्हणून त्यांच्या मागे ठामपणे उभे राहणे, हे माझे कर्तव्य आहे. तसेच आज महिला सबलीकरणाच्या दिशेने ‘लोकमान्य व तरुण भारत संवाद’ परिवाराने उचललेले पाऊल नक्कीच प्रेरणादायी असल्याचे सामंत म्हणाले. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मागील काही दिवस ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना आश्वस्थ करतो की, पात्र महिलांना लाडक्या बहीण योजनाचा लाभ मिळणार आहे, ही योजना बंद होणार नाही, असा शब्द आपण देत असल्याचे उदय सामंत म्हणाले.
पोलीस अधिकारी होण्यासाठी घरच्यांनी प्रोत्साहन दिले. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकडवाड म्हणाल्या, पोलीस विभागाविषयी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की, पोलिसांना २४ तास ड्युटी करावी लागते, त्यामुळे महिलांना या क्षेत्रात पाठविण्यास पालक धजावत नाहीत. पण परिस्थिती आता बदलली आहे. रत्नागिरी पोलीस विभागातच आज ४० टक्के महिला अंमलदार व अधिकारी आहेत. माझे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले, माझे वडील ऊसतोड कामगार होते लग्नानंतर माझे पती व दीर यांनी अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच मी २००९ साली डीवायएसपी पदापर्यंत पोहचू शकले. लग्नानंतरदेखील स्वत:चं करिअर करणाऱ्या महिला आहेत. फक्त त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे गरजचे आहे.
सायबर गुन्ह्यांबाबत महिलांना मार्गदर्शन करताना गायकवाड म्हणाल्या, अलिकडे सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे. समाजमाध्यमांचा गैरवापर करून ब्लॅकमेल केले जात आहे. महिला या प्रकारांना बळी पडत असल्याचे दिसून येत आह़े महिलांनी आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर न करता सुरक्षितता बाळगावी अन्यथा आत्महत्यासारखे प्रकार देखील घडतात. नवऱ्यामुळे उद्योगक्षेत्रात यशस्वी होऊ शकले!
जागृत मोटर्सच्या संचालिका रेश्मा जोशी म्हणाल्या, परमेश्वराने महिलांना मोठी सहनशक्ती दिली आह़े आपल्याला दिलेले सामर्थ्य महिलांनी ओळखून स्वत:ला तसेच आपल्या मुलांना घडवावे. जागृत मोटर्समध्ये आपण अनेक मुलींना घडविले आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी प्रसंगी आपल्याला कडक वागावे लागते. त्यामुळे कुणाचीही वाईट नजरेने पाहण्याची हिंमत होत नाही. कोणत्याही कामाची लाज बाळगता कामा नये. लग्न झाल्यावर रत्नागिरीत आल्यानंतर नवऱ्याची साथ मिळाली आणि आपण उद्योगक्षेत्रात यशस्वी होवू शकले.
महिला उत्तम व्यवस्थापक : सई ठाकूर-बिजलानी
‘तरूण भारत संवाद’च्या संचालिका सई ठाकुर-बिजलानी म्हणाल्या, महिला उत्तम व्यवस्थापक असतात. महिलांना यशस्वी होण्यासाठी पुरुषांची सुद्धा साथ तेवढीच महत्वाची असते. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी सदैव कार्यरत आहे. गाव दत्तक घेऊन महिलांना रोजगार निर्मितीसाठी मदत करणे, शैक्षणिक सोयी-सुविधा यासह विविध सामाजिक उपक्रम लोकमान्य सोसायटी वेळोवेळी राबवत असते. आज या ठिकाणी निवडक महिलांचा केलेला गौरव व महिलांसाठी लोककला स्पर्धेचे आयोजन हे अशाच एका सामाजिक उपक्रमाचे उदाहरण आहे. तसेच तुमचे प्रश्न मांडण्यासाठी ‘तरुण भारत संवाद’ सदैव आपल्यासोबत आहे.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोयायटीकडून विविध क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ३८ वर्षे चणाभट्टी चालविणाऱ्या अनिता आडविलकर, ‘स्वगृही’ वृद्धाश्रम चालविणाऱ्या वीणा लेले, खो-खोपटू पायल पवार, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. श्रुती कदम, स्कूल बस चालविणाऱ्या सादिका सय्यद, विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या मानसी कांबळे, नगरपालिकेच्या सफाई कामगार सुजाता कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, माजी नगरसेविका वैभवी खेडेकर, स्मितल पावसकर, दिशा साळवी तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या सूत्रसंचालन दिप्ती कानविंदे यांनी केले.