लोककल्पतर्फे ग्रामीण महिलांना शिवणयंत्रांचे वाटप
स्वावलंबनाच्या दिशेने ठोस पाऊल; महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना
बेळगाव : लोककल्प फौंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील पारवड, तळवडे, हुळंद, गोल्याळी, बैलूर, चिखले, चिगुळे, चोर्ला आणि कणकुंबी गावातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने शिवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना स्वरोजगार मिळावा, त्यांना नियमित उत्पन्न मिळावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. लोककल्प फौंडेशनचे संचालक किरण गावडे यांच्या उपस्थित हा उपक्रम पार पडला. यावेळी अनिकेत पाटील, विठ्ठल खुन्नुरे, अनंत गावडे, सुहासिनी पेडणेकर, किशोर नाईक व संदीप पाटील उपस्थित होते. लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम भागातील महिलांचा कौशल्यविकास, रोजगारनिर्मिती व उपजीविकेच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी लोककल्प फौंडेशन सातत्याने कार्यरत आहे. शिवणयंत्र मिळाल्याने सर्व महिलांनी लोककल्पचे आभार मानले. यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला.