शंभरहून अधिक चोऱ्या करणाऱ्या लोकेशच्या आवळल्या मुसक्या
ओल्ड गोवा पोलिसांची कारवाई
पणजी : आंतरराज्य घरफोडी प्रकरणातील संशयिताला ओल्ड गोवा पोलिसांनी कवठे महांकाळ (महाराष्ट्र) येथे अटक केली आहे. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यात 100 हून अधिक घरफोड्या त्यांने केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक पेलेल्या संशयिताचे नाव लोकेश रावसाहेब सुतार (30 मिरज-सांगली) असे आहे. गेल्या 28 सप्टेंबर रोजी ओल्ड गोवा येथील एसएफएक्स कॉलनीतील आपल्या मित्राच्या घरात चोरी झाल्याची तक्रार सीमा सिंग यांनी ओल्ड गोवा पोलिसस्थानकात दाखल केली होती.
संशयिताने फ्लॅटमध्ये प्रवेश करून 3 हजार ऊपये रोख तसेच मौल्यवान वस्तू चोरल्याचे तक्रारीत म्हटले होते. या संदर्भात ओल्ड गोवा पोलिसांनी तपास सुऊ केला असता संशयिताचा सुगावा लागला. ओल्ड गोवा पोलिसांने मिरज, सांगली आणि महाराष्ट्राच्या इतर भागांना तीनवेळा भेटी दिल्या व कवठेमहाकाळ पोलिसस्थानकात तसेच सांगली ग्रामीण पोलिसस्थानकाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने संशयिताचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. सोपस्कर पूर्ण करून त्याला गोव्यात आणले. चौकशीदरम्यान संशयिताने चोरीची कबुली दिली असता ओल्ड गोवा पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 331(1) 305, 324(2) अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे.
संशयिताची कसून उलटतपासणी केली असता संशयिताने गोव्यात तसेच महाराष्ट्रातील नागपूर, मुंबई, पुणे, सांगली, सातारा भागात 100हून अधिक घरफोड्या केल्या आहेत. तसेच कर्नाटकातील अनेक भागात चोऱ्या केल्या आहेत. अनेकवेळा महाराष्ट्र तसेच कर्नाटक पोलिस संशयिताच्या शोधात गोव्यात आले होते. मात्र प्रत्येक वेळी पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात तो यशस्वी ठरत होता. ओल्ड गोव्यात झालेल्या चोरी प्रकरणाचा तपास करताना ओल्ड गोवा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासली असता संशयिताच्या चेहऱ्याची ओळख पटली होती.